मुंबई : मालाडच्या मालवणी इथं घडलेल्या दारूकांडातील बळींची संख्या ९४ वर गेली असून, आणखी ४० जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेला ७२ तास उलटूनही तीन गुत्त्यांवर दारू पिऊन आजारी पडलेले पालिका रुग्णालयांमध्ये भरती होत आहे. त्यामुळं बळींची संख्या शंभरावर पोहोचेल अशी भीती व्यक्त होत आहे.
याप्रकरणी गुन्हे शाखेनं सलीम मेहबूब शेख ऊर्फ जेंटल (३९) आणि फ्रान्सिस थॉमस डिमेलो (४६) दोन मुख्य आरोपींसह राजू हणमंता पास्कल उर्फ राजू लंगडा (५०), डोनाल्ड रॉबर्ट पटेल (४७) आणि गौतम हारटे (३०) अटक केली आहे. पोलीस ही दारु कोणत्या भट्टीवरून या गुत्त्यांवर आली, याचा शोध घेत आहेत.
जेंटल आणि डिमेलो हे दोघं मुंबईत तयार झालेली किंवा मुंबई बाहेरून आलेली गावठी दारू खरेदी करून मालवणीतील छोट्या-मोठ्या गुत्त्यांवर विकतात. या दोघांनी दारूत मिथेनॉल मिसळलं आणि ती पुढे गुत्त्यांवर पाठवली, अशी माहिती प्राथमिक तपासातून समोर आल्याचं गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं. भट्टीत गाळलेली दारू दोन ते तीन टप्प्यांमध्ये मुंबईत येते आणि पुढे गुत्त्यांवर पोहोचते. यादरम्यान दारूची वाहतूक करणारे आणि प्रत्यक्ष दारू गाळणारे यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जेंटल, डिमेलोला दारू विकणारा सापडणं महत्वाचं आहे, अशी माहिती मिळतेय.
या दारूकांडाला जबाबदार धरून उत्पादन शुल्क विभागानं अंधेरी युनिटच्या चार अधिकारी-कर्मचाऱ्यांना निलंबित केलंय. निरीक्षक जगदीश देशमुख, राजेंद्र साळुंखे, शिपाई वर्षा वेंगुर्लेकर, धनाजी साळवी अशी त्यांची नावे आहेत. शुक्रवारी रात्री हा निर्णय आयुक्त शामसुंदर शिंदे यांनी घेतला.
दारूकांडाला जबाबदार धरून पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश पाटील यांना निलंबित केलं. यासह आणखी सात जणांना निलंबित करण्यात आलं. त्यामध्ये एपीआय जगदीश पन्हाळे, फौजदार शंकर घार्गे, मनीषा शिरसाट, हवालदार राम मिलन सिंह, अरुण जाधव, पोलीस नाईक संजय माने, विलास देसाई यांचा सहभाग आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.