मुंबई : मंगळसूत्र विकून शौचालय बांधणारी संगीता आव्हाळे, लग्नात रुखावतामध्ये शौचालय मागणारी चैताली देवेन्द्र माकोळे आणि शौचालय बांधण्यासाठी कर्ज काढणारी सुवर्णा लोखंडे. या तीन महिलांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे स्वच्छतादूत म्हणून निवड केली आहे.
स्वच्छ महाराष्ट्र अभियानाबाबत संकेतस्थळाचे उद्धाटन मुख्यमंत्र्यांनी केले. त्यावेळी राज्यात स्वत:च्या उदाहरणाने स्वच्छतेच्याबाबतीत आदर्श ठेवणाऱ्या या तीन महिलांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी तीन महिलांची स्वच्छतादूत निवड केल्याची घोषणा केली. राज्यात गेल्या वर्षी 2 ऑक्टबरला ही स्वच्छता मोहीम सुरु करण्यात आली आहे. मात्र, काही ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला तर काही ठिकाणी या अभियानाचा बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे.
पहिल्या टप्प्यात हागणदारी मुक्त गाव - शहर असा उपक्रम राबवण्यात आला होता. यामध्ये राज्यातील १९ नगरपालिका आणि मुंबई महानगरपालिकेतील २ वार्ड हे हगणदारी मुक्त म्हणून जाहीर करण्यात आले. यावेळी या शहरांमधील प्रतिनिधींचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या निमित्ताने राज्यात २ ऑक्टोबर २०१७ पर्यंत सर्व शहरे हगणदारी मुक्त करणार असल्याचं जाहीर करण्यात आले.
हगणदारीमुक्त अभियानाबरोबर आता स्वच्छतेसाठी घनकचरा व्यवस्थापन आणि त्यानंतर सांडपाणी व्यवस्थापन मोहीम हाती घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. सांडपाणी व्यस्वथापनामध्ये प्रक्रिया झालेले पाणी हे वीज निर्मिती प्रकल्पांसाठी आणि MIDC मधल्या कार्यक्रमांसाठी वापरता येण्याबबत पॉलिसी तयार केली जात असल्याचं यावेळी स्पष्ट केलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.