मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी मनसेच्या प्रचाराचा नारळ अखेर आज फुटणार आहे. विक्रोळी मध्ये आज संध्याकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली जाहीर सभा होत आहे.
तर आजच विलेपार्ल्यात राज ठाकरे यांची दुसरी सभाही होतेय. ठाकरे यांच्या काही व्यक्तिगत कारणांमुळे यंदा मनसेच्या प्रचाराला उशिरा सुरुवात होत आहे. याआधी 9 फेब्रुवारीला प्रचाराची पहिली जाहीर सभा होणार होती, मात्र ती ऐनवेळी रद्द करण्यात आली होती.
राज ठाकरे यांच्या मुंबईत प्रचाराच्या तीन सभा होणार आहेत. तर ठाणे, पुणे आणि नाशिक मध्ये प्रत्येकी एक सभा होणार आहे. प्रचाराच्या समारोपाची सभा 18 फेब्रुवारीला दादरमधल्या दत्ता राऊळ मैदानात पार पडणार आहे.
शिवसेना भाजपची युती तुटल्यानंतर विजयासाठी दोन्ही पक्षांमध्ये सुरु असलेल्या धर्मयुद्धावर राज ठाकरे नेमकी काय भूमिका मांडतात, तसंच मनसेला मत देण्यासाठी मतदारांना काय आवाहन करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे.