www.24taas.com, मुंबई, दिनेश दुखंडे
मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्याकडं त्यांनी राजीनामा सोपवला. कालच त्यांनी मनसे सोडण्याचा आणि आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता.
औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते. पक्षामध्ये अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचं सांगत, स्वाभिमान दुखावल्यामुळेच राजीनामा दिल्याचं त्यांनी सांगितलं. यापुढची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. जाधव यांनी राजीनामा दिल्यामुळे मनसेचा आणखी एक आमदार कमी झाला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड मतदारसंघाचे ते आमदार असून यापूर्वीही ते मनसे सोडणार असल्याची चर्चा होती. परंतु त्यावेळी त्यांची नाराजी दूर करण्यात मनसे नेत्यांना यश आलं होतं. मनसेच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याचा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी `झी 24 तास`ला दिलेल्या एक्सक्ल्युझिव्ह मुलाखतीत म्हटलंय. यापुढे कोणत्याही पक्षात जाणार नसून, वडिलांच्या नावावर अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
मनसेच्या जोखडातून मुक्त झाल्याची भावना व्यक्त करतानाच, पक्षप्रमुख आपल्याशी अत्यंत घाणेरड्या भाषेत बोलल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.