मुंबई : राज्यातल्या बैलागाडा शर्यतीवरची बंदी तात्काळ उठवा अशी मागणी करत आमदार महेश लांडगेंनी विधानभवनात अनोखं आंदोलन केलं. आमदार महेश लांडगे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान भवनात चक्क बैलजोडी घेऊन आले.
गेल्या अनेक वर्षांपासून आमदार महेश लांडगे यांनी राज्यसरकार व केंद्रसरकारकडे बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी पाठपुरावा सुरु केला आहे.
तामिळनाडूमधील जलीकटटू स्पर्धेला विधानसभेत कायदा संमत करून परवानगी देण्यात आली. तेथील लोकभावनेचा आदर करून तामिळनाडू सरकारने कायद्यात बदल केला, त्यामुळे तामिळनाडूच्या धर्तीवर राज्यातील बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु करावी. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी लावून धरली आहे.
या आंदोलनानंतर महेश लांडगेंनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं. बैलगाडा शर्यतीबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचं त्यांनी आपल्याला सांगितल्याचं महेश लांडगे म्हणालेत. दरम्यान यासंदर्भात कायदेशीर मत तपासून पाहात आहोत. या अधिवेशनात हे विधेयक संमत व्हावे अशी अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी दिली आहे.