मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना थेट कॅबिनेटची लॉटरी लागली. मात्र, त्यांच्या आईने त्यांना तंबीच दिलेय. चांगले काम कर नायतर मार खाशील! (VIDEO बातमीच्या शेवटी पाहा)
जानकर यांना कॅबिनेट मंत्रिपद देऊन मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांनाच आश्चर्यचकित केले आहे. या सुखद धक्क्यामुळे जानकर समर्थकांच्या आनंदाला उधाण आले आहे. तर दुसरीकडे राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारातनंतर महादेव जानकर यांना त्यांच्या आईने शपथविधीनंतर लगेचच तंबी देऊन ठेवली. जानकर यांच्या आईचे वय ९१ वर्ष आहे.
जानकरांच्या आईने त्यांना लगेच आपल्या जबाबदारीची जाणीव करून दिली. आपल्या मुलाला शुभेच्छा आणि आशीर्वाद देतानाच चांगले काम केले नाय तर मारीन, असेही खडसावले. त्यांची ही प्रतिक्रिया ऐकून उपस्थितांना हसू आवरेना.
दरम्यान, शेतकऱ्याचा मुलगा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनाही राज्य मंत्रीपद मिळाल्याने कार्यकर्त्यांत मोठा आनंद आहे. त्यांनीही त्यांच्या आईने आशीर्वाद देताना चांगले काम करण्याचा सल्ला दिला.
शेतकऱ्यांच्या आशीर्वादाने इथवर पोहोचलोस, याची जाण ठेवून आपल्या मुलाने यापुढेही शेतकरी आणि गोरगरिबांसाठी काम करत राहावे, अशी इच्छा सदाभाऊ खोत यांच्या आईने व्यक्त केली आहे.