मुंबई : धनगर आरक्षणामुळे चर्चेत आलेले तसेच आपली भीष्मप्रतिज्ञेसाठी परिचित असलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार महादेव जानकर यांनी, वादग्रस्त राधे माँच्या दरबारात हजेरी लावली आहे.
लाल दिव्याची गाडी आपल्याला मिळत नाही, फडणवीस सरकार आपल्यावर फिदा होत नाही, म्हणून नाऊमेद असलेल्या जानकर यांनी राघेमाँला साकडे घातले, अशी चर्चा सोशल मीडीयात आहे.
राधेमाँ काही महिन्यांपूर्वी लैंगिक शोषणासह इतर आरोपांमुळे वादग्रस्त ठरलेली आहे. जानकर धनगर समाजाचे नेते असले तरी, मात्र त्यांची जडणघडण झाली बसपा संस्थापक कांशीराम यांच्या तालमीत झाली.
धनगर समाजातला पण आंबेडकरी दृष्टिकोन असणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे विधिमंडळात बोलताना जानकरांचे बाबासाहेबांच्या विधानाशिवाय पानही हलत नाही. तेच जानकर गुरुवारी स्वयंघोषित ग्लॅमरस धर्मगुरू राधेमाँच्या बोरिवलीतील दरबारात दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
बोरिवलीत राधेमाँचा सिंग हाऊस नावाचा बंगला आहे. राधे माँच्या दरबारात जाण्यासाठी लाखो रूपये मोजावे लागतात. राधेमाँचा व्यवस्थापक टल्ली यास खुश करावे लागते. बरे इतके करून भागत नाही.
राधेमाँ म्हणते तो हट्ट पुरवावा लागतो. त्यासाठी पैसे तर मोजावे लागतात, पण राधेमाँला वाटले तर तिला भक्ताने उचलूनही घ्यावे लागते, असे त्यांचे काही भक्त खासगीत सांगतात. जानकरांनी मात्र तिथपर्यंत जाण्याचा मार्ग मिळवला याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
एका कार्यकर्त्याने राधे माँची भक्ती कॅमेऱ्यात कैद केल्याने, हे फोटो बाहेर आले आहेत. जानकरांचे ते सर्व फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.