मुंबई : अंधेरीत लोटस पार्कची आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताना अग्निशमन दलाचा एक जवान शहीद झालाय. नितीन इवलेकर असं त्यांच नाव असून ते बोरिवली फायर स्टेशनमध्ये कार्यरत होते. त्यांनी काही दिवसांपूर्वी स्वत:चं घर घेतलं. त्या घरात ते राहायलाही गेले. मात्र, घर सजवायची इच्छा अधुरीच राहिली.
अंधेरीतल्या लोटस बिझनेस पार्कमध्ये लागलेल्या आगीत नितीन यांचा मृत्यू झाला. नितीन इवलेकर यांच्या मागे पत्नी, तीन वर्षांची मुलगी आणि एक सहा महिन्यांची मुलगी असा परिवार आहे. नितीनच्या रूपानं फायर ब्रिगेडनं एक हरहुन्नरी आणि धाडसी जवान गमावलाय. 2005 साली वडिलांच्या जागी ते फायर ब्रिगडेमध्ये भरती झाले. 2010 पासून बोरिवली फायर स्टेशनला ते कार्यरत होते. चार महिन्यांपूर्वीच ते विरारला नव्या घरात कुटुंबासह राहायला गेले होते.
अंधेरीतल्या लोटस बिझनेस पार्क या 22 मजली इमारतीमध्ये शुक्रवारी अक्षरशः अग्नितांडव पाहायला मिळाले. तब्बल साडेसहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर फायर ब्रिगेडनं ही आग आटोक्यात आणली. या भीषण आगीत फायर ब्रिगेडचा एक जवान शहीद झाला असून, आगीशी मुकाबला करताना अनेक जवान जखमी झाले.
वेळ - सकाळी 9.45 वाजता
अंधेरी वेस्टला लिंक रोडवरील लोटस बिझनेस पार्क या 22 मजली इमारतीला आग लागली. इमारतीच्या 21 व्या मजल्यावर एका एडिटिंग कंपनीच्या ऑफिसच्या कँटिनमधून धूर येऊ लागला. जोराच्या वा-यामुळं ही आग प्रचंड वेगानं पसरू लागली. बघता बघता 21 वा मजला आणि 20 वा मजला आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.
वेळ - सकाळी 10.30 वाजता
आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. एक नंबरची आग असल्यानं चार फायर टँकर घटनास्थळी पोहोचले. मात्र आगीने भीषण रूप धारण केल्यानं, नंबर दोनचा कॉल देण्यात आला. 12 फायर इंजिन आणि 9 पाण्याचे टँकर्स लोटस बिझनेस पार्कमध्ये आग विझवण्यासाठी पोहोचले.
वेळ - सकाळी 11 वाजता
एव्हाना आगीची बातमी वा-यासारखी सर्वत्र पसरली. लोटस बिझनेस पार्कमध्ये अनेक कंपन्यांची ऑफिसेस असल्यानं ती तत्काळ रिकामी करण्यात आली. इमारतीतून बाहेर पडणारे कर्मचारी, रस्त्यावरील बघ्यांची गर्दी, चिंचोळे गजबजलेले रस्ते आणि वाहनांची कोंडी यामुळे आग विझवण्याच्या कामात अडथळे येत होते. सिने अभिनेता हृतिक रोशन यांच्या सिनेनिर्मिती कंपनीचे ऑफिसही याच इमारतीत आहे. त्यामुळं हृतिक रोशनही आगीच्या ठिकाणी पोहोचला.
वेळ - दुपारी 12.40 वाजता
आगीने आता रौद्र रूप धारण केलं होतं. आगीच्या लालभडक ज्वाळांनी इमारतीचा 21 वा, 22 वा आणि 20 वा मजला वेढला गेला होता. फायर ब्रिगेडकडून आणिबाणीचा 'ब्रिगेड कॉल' देण्यात आला. उंचावरील आग विझवण्यासाठी वापरण्यात येणारी खास शिडी म्हणजे हायड्रॉलिक लिफ्ट भायखळा येथील अग्निशमन केंद्रातून मागवण्यात आली. प्राणांची बाजी लावून अग्निशमन दलाचे जाँबाज जवान आगीशी झुंज देत होते. मात्र इमारतीच्या काचा फुटत असल्यानं, लिफ्ट बंद असल्यानं आणि वीजपुरवठा बंद असल्यानं बचावकार्यात अडथळे येत होते. आगीने रौद्र रूप धारण केल्यनंतर बचावकार्य करणारे 33 जवानच इमारतीत अडकून पडले.
वेळ - दुपारी 1.15 वाजता
लोटस पार्कमध्ये आगीचे तांडव सुरू होते. आग विझवण्यासाठी 21 बंब आणि पाण्याचे टँकर पोहोचले होते. 21 आणि 22 व्या मजल्यावर अडकून पडलेल्या अग्निशमन जवानांना बाहेर काढण्यासाठी नौदल आणि तटरक्षक दलाच्या पाच हेलिकॉप्टर्सची मदत मागवण्यात आली.
वेळ - दुपारी 1.40 वाजता
तटरक्षक दलाचे चेतक हेलिकॉप्टर आणि नौदलाचे सी किंग अशी दोन हेलिकॉप्टर घटनास्थळी पोहोचली. आगीच्या ज्वाळांनी इमारत पेट घेत असताना, या हेलिकॉप्टर्समधून दोघा जखमी जवानांना एअर लिफ्ट करण्यात आलं. मात्र अजूनही इमारतीच्या गच्चीवर काही जवान अडकून पडले होते. तर जखमी जवानांवर इमारतीच्या आवारातच प्राथमिक उपचार सुरू करण्यात आले.
वेळ - दुपारी 2.20 वाजता
ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी शब्दशः प्राणांची बाजी लावली. दुर्दैवानं बोरिवली फायर स्टेशनचे जवान नितीन इगुलकर हे आगीशी मुकाबला करताना शहीद झाले. इगुलकरांच्या मृत्यूच्या बातमीनं सर्वांनाच गहिवरून आलं. आणखी 11 जवान जखमी झाले, तर दोघा गंभीर जखमींवर कूपर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्यात आले.
वेळ - दुपारी 3.35 वाजता
जवळपास साडेसहा तासांच्या अथक प्रयत्नांनतर लोटस बिझनेस पार्कमध्ये लागलेली भीषण आग आटोक्यात आणण्यात आली. इमारतीत अडकलेल्या इतर जवानांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.