मुंबईकरांनो सावधान, 'लेप्टो' परतलाय... आठवड्यात १२ बळी!

मुंबईत लेप्टोस्पायरोसिस परत आलाय. मुंबईकरांसाठी पावसाळ्यात ही धोक्याची घंटा वाजलीय. गेल्या पाच दिवसांत १२ जणांचा मृत्यू झालाय. 

Updated: Jul 8, 2015, 11:34 AM IST
मुंबईकरांनो सावधान, 'लेप्टो' परतलाय... आठवड्यात १२ बळी! title=

मुंबई : मुंबईत लेप्टोस्पायरोसिस परत आलाय. मुंबईकरांसाठी पावसाळ्यात ही धोक्याची घंटा वाजलीय. गेल्या पाच दिवसांत १२ जणांचा मृत्यू झालाय. 

यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांना साथीच्या आजारांचा मोठा धोका आहे. डेंग्यूने शहरात डोकं वर काढलं आहेच. त्यात आता लेप्टो स्पायरोसिस या भयंकर रोगाने पुन्हा एकदा दणका द्यायला सुरूवात केलीय. अवघ्या एका महिन्यात लेप्टोस्पायरोसिसच्या 21 केसेस दाखल झाल्या आहेत. १ जुलै ते ६ जुलै या अवघ्या ५ दिवसांत १२ जणांचा मृत्यू झालाय. 

विशेष म्हणजे, पश्चिम उपनगरात या रोगाची साथ मोठ्या प्रमाणात आढळली आहे. मृत्यू पावलेले रूग्ण दहीसर ते गोरेगाव या भागातले आहेत, अशी माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी पद्मजा केसकर यांनी दिलीय. 

'लेप्टो' होण्याची कारणं... 

  • लेप्टोचा संसर्ग पावसाळ्यात साठलेल्या सांडपाण्याने होतो

  • संसर्ग झालेल्या प्राण्यांचं मूत्र पावसाळ्यात साठलेल्या पाण्यात मिसळले जाते

  • अशा पाण्याशी उघड्या जखमांचा संपर्क आल्यास लेप्टोचा संसर्ग होतो

  • उंदीर, कुत्रा या प्राण्यांच्या मुत्रापासून संसर्ग होण्याचा संभव अधिक असतो

मात्र, मुंबईवर पुन्हा लेप्टोनं आक्रमण केलं असलं तरी घाबरून जाण्याचं कारण नाही.  

'लेप्टो'पासून काय काळजी घ्याल?

  • संसर्ग रोखण्यासाठी पावसाळ्यात साठलेल्या पाण्यात जाऊ नये

  • साठलेल्या पाण्यातून जावेच लागले तर, गमबूट घालून जावे  

  • उघड्या जखमांशी पाण्याचा संपर्क येणार नाही याची काळजी घ्यावी

  • लेप्टोचा उपचार शक्य आहे, त्यासाठी लवकरात लवकर निदान होऊन उपचार आवश्यक आहेत. 

'लेप्टो'ची लक्षणं... 

  • ताप, अंगदुखी, डोकेदुखी, पोटदुखी ही प्रामुख्याने लेप्टोस्पायरोसिसची लक्षणं आहेत. 

त्यामुळे मुंबईकरांनो सावधान... या लक्षणांपैकी काहीही आढळल्यास अंगावर काढू नका.. तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.