मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक उचल्याकार लक्ष्मण गायकवाड यांनी पत्नीसह स्वत:ला कोंडून घेत उपोषण सुरु केले आहे.
गोरेगाव चित्रनगरीतील भूखंड ताब्यात घेण्याच्या शासनाच्या कारवाईवरुन त्यांनी हे पाऊल उचलले आहे. आपला चरितार्थ चालवण्यासाठी राज्य सरकारने भाडेतत्त्वावर दिलेला भूखंड परत घेऊ नये, अशी वारंवार विनंती करुनही सरकार निष्ठूरपणे भूखंड परत घेण्याची कारवाई करत असून सरकारच्या पवित्र्याचा निषेध करण्यासाठी आपण हे पाऊल उचलत असल्याचं लक्ष्मण गायकवाड यांनी सांगितलंय.
सूडबुद्धीतून ही कारवाई करण्यात आलीये. तसंच या भूखंडावर अनेकांचा डोळा आहे. त्यामुळे जोपर्यंत राज्य सरकार नव्याने करार नियमीत करत नाही, तोपर्यत हे आंदोलन सुरुच राहील असा पवित्रा त्यांनी घेतलाय.
दरम्यान हा भूखंड त्यांनी मेसर्स प्रफुल फास्टफूड यांना उपहारगृह चालविण्यासाठी दिला होता. सदर भूखंडाचा करार संपूष्टात आल्यानंतर चित्रनगरीच्या महामंडळाने त्यावर कायदेशीर कार्यवाही सुरु केली. न्यायालयानेही सदर कारवाई ग्राह्य धरत हा भूखंड पुन्हा ताब्यात घेण्याचे आदेश दिले.
न्यायालयाच्या निकालानुसारच गायकवाड यांच्या उपहारगृहावर कारवाई करण्यात आली. या सर्व कारवाईमध्ये कुटनिती कुठे येते, असा सवाल मंत्री विनोद तावडे यांनी करतानाच गायकवाड यांचा दावा फेटाळून लावला आहे.