मुंबई : काळापैसा आणि भ्रष्टाचार मुक्त भारत करण्यासाठी मोदींच्या सर्जिकल स्ट्राईकला अनेकांनी पसंती दर्शवली तर काहीनी विरोध केला. तर अनेकांकडून राजकारण सुरु झालं.
काळ्या पैशांवरुन सुरु असलेल्या राजकारणावरुन भाजप खासदार किरीट सोमय्यांनी म्हटलं की, लवकरात लवकर अशा भ्रष्ट कंपन्यांवर कारवाई करू जेथे शहरातील काही लोकं आपला पैसा गुंतवत आहेत. 500 आणि 1000 च्या नोटांवर बंदी घालण्याच्या निर्णयावर विरोधी पक्षांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच भाजपसोबत युतीत असलेल्या शिवसेनेने सुद्धा यावर टीका केली.
शिवसेनेला उत्तर देतांना किरीट सोमय्या म्हणाले की, उद्धव ठाकरेंना दाखवतो की काळ्यापैशांवर सर्जिकल स्ट्राईकचा अर्थ काय असतो. तसेच लोकांचा काळापैसा ज्या कंपन्यांमध्ये जातो त्या सर्व भ्रष्ट कंपन्यांची यादी लवकरच जाहीर करेल. किरीट सोमय्यांनी दिलेल्या उत्तरावर उद्धव ठाकरेंनी प्रत्यूत्तर दिलं आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी असा एक सर्जिकल स्ट्राईक स्विस बँकेवर सुद्धा केला पाहिजे, की ज्यामुळे काळापैसा देशात परत आणता येईल. तसेच सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे जनतेला त्रास होत आहे, जनतेचा पंतप्रधानांवर विश्वास आहे, परंतू तो तोडण्याचा प्रयत्न करू नका, नाही तर लोक तुमच्या विरोधातच सर्जिकल स्ट्राईक करतील.' असं उद्धव यांनी म्हटलं आहे.
'मुंबई माफिया'च्या माध्यामातून बीएमसीवर निशाणा साधत किरीट सोमय्या म्हणाले की, 'बीएसपी प्रमुख मायावती, सपाचे प्रमुख मुलायम सिंह यादव आणि उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट करावे की, त्यांना लोकांची चिंता वाटते की, पैशांनी भरलेल्या बॅाक्सची चिंता वाटते. तसेच ज्यावेळी मी यादी जाहीर करेन त्यावेळी 'मुंबई माफियां' सोबतच काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष पण समजून जाईल की काळापैसा कुठे ठेवला जातो.'
मागील काही दिवसांपासून भाजप खासदार किरीट सोमय्या 'मुंबई माफिया' या शब्दाचा वापर करत आहेत. याचा अर्थ ते बीएमसीमधील भ्रष्ट्राचाराच्या आरोपांवर टीका करत आहेत. किरीट सोमय्या म्हटले की, पुढच्या आठवड्यात मी कंपन्यांच्या नावांची यादी जाहीर करेल तेव्हा उद्धव ठाकरेंना समजेल की, 'मुंबई माफिया'चे पैसे कुठे जातात.