www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अतिरिक्त पोलीस महासंचालक आर. के. सहाय यांचं निधन झालंय. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. 14 सप्टेंबर रोजी त्यांनी स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यात ते 60 टक्के भाजले होते. त्यानंतर गेले वीस दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज त्यांचा मृत्यू झाला.
आर. के. सहाय यांनी मलबार हिल इथल्या अवंती अंबर इमारतीतील आपल्या राहत्या घरी स्वत:वर रॉकेल टाकून जाळून घेतलं होतं. कुटुंबाच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी ताबडतोब आग आटोक्यात आणून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांना हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलं.
आर. के. सहाय गंभीर भाजलेल्या अवस्थेत असल्यानं पोलिसांना जबाब नोंदविता आला नव्हता. डॉक्टरांचे प्रयत्न फोल ठरले आणि आज सहाय यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे सहाय यांनी नेमकी आत्महत्या करण्याचा निर्णय कोणत्या कारणानं घेतला हे मात्र उघड होऊ शकलेलं नाही.
कामातील ताण-तणाव, राजकाकरण, नैराश्य अशा अनेक कारणांची चर्चा सध्या सुरू आहे. यामध्येच अलिकडेच आर. के. सहाय यांच्या एका अंतर्गत अहवालाची दखल घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं आयएएस अधिकारी दीपक कपूर यांची चौकशी सुरू केली होती... त्याचा या घटनेशी संबंध असल्याची कुजबुजत सुरू आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.