मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीआधी विरोधक आक्रमक झालेत. इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक उभारण्यात येणार आहे. मात्र या स्मारकाचं काम सुरु न झाल्याने विरोधक आक्रमक झालेत.
दोन्ही पक्षाच्या आमदारांनी इंदू मिल परिसराला भेट दिली. यावेळी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी इंदू मिल समोर जोरदार घोषणाबाजी केलीय. डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाचं काम लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी यावेळी विरोधकांनी केलीय. सरकारनं आंबेडकरी जनतेची फसवणूक केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय.
गेल्या वर्षी इंदू मिलच्या जागी उभारण्यात येणा-या स्मारकाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भूमीपूजन पार पडलं. त्यानंतर इंदू मिलची साडेबारा एकर जागा केंद्राकडून हस्तांतरित झाली नसल्याने त्याचं काम रखडलं होतं.
काही दिवसांपूर्वी इंदू मिलची जागा केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने राज्य सरकारला हस्तांतरीत केलीय.. मात्र अद्याप स्मारकाचं काम झालेलं नाही... मात्र आंबेडकर जयंतीच्या तोंडावर अशाप्रकारचे आंदोलन करुन विरोधक राजकारण करतायत का असा सवाल उपस्थित करण्यात येतोय.