www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मनसेला सोबत घेऊन निवडणुकीत उतरा असा सल्ला, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. जर मनसे सोबत येत नसेल, तर किमान मैत्रिपूर्ण वातावरणात निवडणूक लढवा, म्हणजेच मनसे विरोधात महायुतीच्या विरोधात जाणार नाही याची काळजी घ्या, असा सल्लाही राजनाथ सिंह यांनी उद्धव ठाकरे यांना दिला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
महायुतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेसारखा नवा भिडू मिळाल्यानंतर भाजपने निवडणुकीच्या तोंडावर एनडीएची तटबंदी आणखी सुरक्षित करण्यासाठी पावलं उचलली आहेत. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वेळोवेळी आपण महायुतीत जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. यामुळे मनसे महायुतीसोबत जमवून घेईल का?, यानंतरच राजनाथ सिंह यांनी दिलेला सल्ला वजा मात्र लागू पडणार आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नरेंद्र मोदी यांच्यावर कमालीचे नाराज असल्याचे दिसतात. कारण काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून टीका केली आहे. यानंतर राज ठाकरे यांच्यासोबत भाजपने पुन्हा सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू ठेवले असल्याचं समजतंय.
मुंबई आणि उपनगरांमध्ये लोकसभा आणि विधानसभेला सर्वात जास्त जागा जिंकायच्या असतील, तर मनसे शिवाय पर्याय नसल्याचंही भाजपच्या लक्षात आल्याचं सांगण्यात येत आहे. लोकसभेत हमखास विजयासाठी महायुतीला मनसेची नितांत गरज असल्याचं यावरून दिसून येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.