www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आगामी विधानसभा निवडणूक स्वतः लढण्याची तसंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनण्याची इच्छा जाहीर केल्यानंतर राज ठाकरेंनी स्वतःमध्ये अमूलाग्र बदल केलाय. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं त्यांची पूर्ण लाईफस्टाईलच बदललीय. विधानसभा निवडणुकीत पक्षाची व्यूहरचना ठरवण्यासाठी राज ठाकरे यांनी बैठकांचा सपाटा लावलाय.
मनसे स्थापनेवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरेंना टोमणा वजा सल्ला दिला होता. राजकारणात कष्ट घ्यावे लागतात, सकाळी लवकर उठावं लागतं असं पवार म्हणाले होते. त्यावेळी आपल्या शैलीत ठाकरेंनी या सल्ल्याची खिल्ली उडवली होती, मात्र आता तो त्यांना पटलाय. म्हणूनच की काय राज ठाकरे यांचा सध्या दिवस सकाळी सात वाजता सुरु होतो. कृष्णकुंजवर बैठकांसाठी ते सज्ज असतात. दिवसभरात एका पाठोपाठ एक अशा विविध बैठकांचा कृष्णकुंजवर सपाटाच लागलेला असतो.
पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकांप्रमाणेच राज ठाकरे स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताहेत. विधानसभा निवडणुकीसाठी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नेमकं काय करायचंय याचं मागदर्शन त्यांना करण्यात येतंय.
गेल्या दोन दिवसांत झालेल्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत विविध पद्धतीची सूक्ष्म स्तरावरील माहिती जमा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आलीय.
त्यानुसार पदाधिकाऱ्यांनी तालुका गावांतील रस्ते, पाणी, वीज, आरोग्य शिक्षणापासून ते मनोरंजनाची साधनं, कायदा सुव्यवस्थेची स्थिती, महिला-पुरुष-युवा यांचे प्रश्न-आकांक्षा जाणून घेण्यास सांगण्यात आलंय. राज ठाकरे यांच्या संकल्पनेतील राज्याच्या विकासाच्या ब्ल्यू प्रिंटसाठी या माहितीचा आधार घेतला जाणार आहे.
सोशल नेटवर्किंग साईट्सचं महत्त्व राज ठाकरे यांनी जाणलंय. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या लोकप्रियतेत वाढ होण्यासाठी सोशल नेटवर्किंग साईट्सचा जास्तीत जास्त वापर करताना ते तंत्रज्ञान शिकण्याचे आदेश त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. सोशल नेटवर्किंगवर प्रचारासाठी स्थानिक स्तरावर तज्ज्ञांची टीम तयार करण्याच्या सूचनाही पदाधिकाऱ्यांना करण्यात आल्यात.
एकूणच ही तयारी पाहाता एक बाब लक्षात येते की मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी राज ठाकरे कामाला लागलेत. लोकाभिमुख निर्णय उशीरा घेणाऱ्या राज्य सरकारसंदर्भात राज ठाकरे म्हणतात, देर आये दुरुस्त आये. मात्र, लोकसभा निवडणूकीनंतर आणि विधानसभा निवडणूकींना सामोर जाताना त्यांच्या बाबतीतही काही असंच झालंय असं म्हणावं लागेल... देर आये पर दुरुस्त आये....
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.