www.24taas.com, मुंबई, दिनेश दुखंडे
मनसेच्या आमदारकीचा राजीनामा दिलेल्या हर्षवर्धन जाधव यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर घणाघाती आरोप केले आहेत. निवडणुकीच्या काळात तिकीट वाटपासाठी मनसेत पक्षप्रमुखांकडून पैशांची सर्रास देवाण घेवाण चालत असल्याचा खळबळजनक आरोप हर्षवर्धन जाधव यांनी राज ठाकरेंवर केला आहे.
तसेच मारहाणीचे प्रकरण मिटवण्यासाठी पक्षाकडून सेटलमेंट केली गेल्याचाही आरोप जाधवांनी ‘झी २४ तास’शी बोलताना केला आहे. याचसंदर्भात हर्षवर्धन जाधव यांनी ‘झी २४ तास’ला दिलेल्या खास मुलाखतीत मनसे आणि राज ठाकरे यांच्यावर थेट आरोप केले आहेत.
`निवडणुकीदरम्यान मनसेत पैशांची देवाणघेवाण होते आणि मनसेतील या अर्थकारणामागे पक्षप्रमुखच` असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे. त्यामुळे हर्षवर्धन जाधव यांनी राज ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. पक्ष प्रमुखांनी केलेला अपमान सहन न झाल्याचं सांगताना `राज ठाकरेंनी असंसदीय भाषेचा वापर केल्याने मी राजीनामा देत आहे` असंही हर्षवर्धन जाधव यांनी म्हटलंय.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याच गंभीर आरोप करीत जाधव यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. राज ठाकरेंवर खळबळजनक आरोप केल्याने आता राज ठाकरे नक्की काय भूमिका घेणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.