मुंबई : गुजराती पाटीदार समाजाचे युवा नेते हार्दिक पटेल यांनी मंगळवारी शिवसेनेच्या प्रचारासाठी मुंबईत सभा घेतली.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर गुजराती समाजाची मतं शिवसेनेकडं वळवण्यासाठी शिवसेनेनं हार्दिक पटेल यांना मैदानात उतरवलंय. पटेल यांनी मंगळवारी सकाळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर गुजराती समाजाच्या मेळाव्यात भाषण केलं. शिवसेनेचे उद्योगमंत्री सुभाष देसाईदेखील या मेळाव्याला उपस्थित होते.
उद्धव ठाकरे गुजरातमध्ये आले तर आम्ही त्यांना सहकार्य करू, अशी ग्वाही पटेल यांनी यावेळी दिली. दरम्यान, मुंबईत आपली भाषणं होऊ नयेत, यासाठी सरकारनं अनेक कार्यक्रम रद्द केले, सभांना परवानगी नाकारली... रूम शिल्लक नाही, असं सांगून माझं सामानही बाहेर काढलं, असा आरोप हार्दिक पटेल यांनी केलाय.
मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेनं भाजपला आव्हान देण्यासाठी गुजराती ट्रम्प कार्ड बाहेर काढलंय. मंगळवारी दुपारी हार्दिक पटेल यांनी उद्धव ठाकरेंसोबत संयुक्त पत्रकार घेऊन गुजराती समाजाला शिवसेनेसाठी साद घातलीय. तसंच न्याय हक्कांच्या लढ्यासाठी आपण शिवसेनेला पाठिशी उभं राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. तर शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकलीय, त्यामुळंच शिवसेनेला हार्दिक पटेलला बोलवावं लागलं, असा टोला मुख्यमंत्र्यांनी शिवसेनाला लगावलाय.