पालकांनाच शिकवावं लागतंय शाळेत!

वडाळा येथील डॉनबॉस्को शाळेत चक्क पालकांना विद्यार्थ्यांना शिकवण्याची वेळ आलीय. शिक्षक पालिकेच्या प्रशिक्षणाला जात असल्याची सबब देत शाळा पालकांनाच वर्गावर लावते.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 19, 2013, 10:47 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
वडाळा येथील डॉनबॉस्को शाळेत चक्क पालकांना विद्यार्थ्यांना शिकवण्याची वेळ आलीय. शिक्षक पालिकेच्या प्रशिक्षणाला जात असल्याची सबब देत शाळा पालकांनाच वर्गावर लावते. त्यामुळे महानगरपालिकेचं शिक्षण विभाग आणि शाळा व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केला जातोय.
डॉनबॉस्को ही नामांकित आणि 100 टक्के अनुदानित शाळा... पण सध्या या शाळेत शिक्षक नव्हे तर पालकांवरच विद्यार्थ्यांना शिकवण्याची वेळ आलीय. पालकांनी अभ्यासक्रम शिकवल्यावर विद्यार्थ्यांना कितपत समजत असेल याचा अंदाज लावता येऊ शकतो. विद्यार्थ्यांचीही तशी तक्रार आहे.

शाळेत पालक शिकवत असल्याची कबुली डॉन बॉस्को शाळेनं दिलीय. शाळेचे शिक्षक मुंबई महापालिकेच्या प्रशिक्षणासाठी जात असल्यानं पालकांना शिकवण्यासाठी बोलवावं लागतं, असं मुख्याध्यापकांचं म्हणणंय. मनविसेनेनं याप्रकरणी आक्रमक भूमिका घेतलीय. शिक्षण विभागानं याविरोधात कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय.

विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण कसं देता येईल, यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येतं. पण या प्रशिक्षणासाठी शिक्षक शाळेबाहेर आणि पालकच शिक्षकांची भूमिका करत असतील, तर या सगळ्याचा काय फायदा, असा प्रश्न उपस्थित होतोय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.