सिद्धिविनायक मंदिर मध्यरात्रीही भाविकांसाठी खुले, अलंकारांचा होणार लिलाव

गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी. सिद्धिविनायक मंदिर मध्यरात्रीही भाविकांसाठी खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 

Updated: Apr 5, 2016, 09:43 AM IST
सिद्धिविनायक मंदिर मध्यरात्रीही भाविकांसाठी खुले, अलंकारांचा होणार लिलाव  title=

मुंबई : गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी. सिद्धिविनायक मंदिर मध्यरात्रीही भाविकांसाठी खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर मध्यरात्री दीड वाजल्यापासून खुले राहणार आहे. दरम्यान, अलंकारांचा लिलाव होणार आहे.

७ एप्रिलच्या मध्यरात्री हे मंदिर खुले राहणार आहे. या दिवशी पहाटेची आणि सायंकाळची आरती आणि मंदिर बंद होण्याच्या वेळा नेहमीप्रमाणे राहतील, असे मंदिर प्रशासनाने स्पष्ट केलेय.

गुढीपाडव्याचे औचित्य साधून चारचाकी आणि दोन चाकी वाहने घेणार्‍यांसाठी 'शुभलाभ' भेट योजना ठेवण्यात आली आहे. यात वाहनपुजेचा समावेश आहे. ही वाहनपूजा सिद्धिविनायक मंदिराशेजारील नर्दूल्ला टँक मैदानात सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेपर्यंत होणार आहे. 

सोन्याच्या अलंकाराचा लिलाव 

सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यास, प्रभादेवी यांच्यावतीने सिद्धीविनायक चरणी अर्पण करण्यात आलेल्या सोन्याच्या अलंकाराचा जाहीर लिलाव होणार आहे. गुढीपाडव्याला ८ एप्रिल रोजी हा लिलाव आयोजित केला आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत हा लिलाव पार पडेल. यापैकी काही अलंकार मंदिराच्या आवारात प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेत.