राज्य कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्त्यात ६ टक्के वाढ

राज्य कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाने खुशखबर दिली आहे. महागाई भत्त्यात ६ टक्क्यांनी वाढ केल्याने आता महागाई भत्ता ११९ टक्के झालाय.

Updated: Feb 6, 2016, 07:21 AM IST
राज्य कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्त्यात ६ टक्के वाढ title=

मुंबई : राज्य कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाने खुशखबर दिली आहे. महागाई भत्त्यात ६ टक्क्यांनी वाढ केल्याने आता महागाई भत्ता ११९ टक्के झालाय.

केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) सहा टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. यामुळे महागाई भत्त्याचा दर ११३ टक्क्यांवरून ११९ टक्के इतका झाला आहे. 

सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनाच्या तुलनेत ११९ टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय १ जुलै २०१५ पासून पूर्वलक्षी प्रभावाने देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. वाढीव महागाई भत्ता फेब्रुवारी महिन्याच्या पगारात रोखीने दिला जाईल. तथापि, १ जुलै २०१५ ते ३१ जानेवारी २०१६ या सात महिन्यांच्या वाढी​व महागाई भत्त्याची थकबाकी नंतर देण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आलेय.

वाढीव महागाई भत्ता देण्याच्या निर्णयावर महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाचे नेते ग. दि. कुलथे, सरचिटणीस समीर भाटकर आणि राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे नेते भाऊसाहेब पठाण यांनी समाधान व्यक्त केले. 

दरम्यान, सरकारने चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत काहीच निर्णय न घेतल्यामुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेय. तर ९ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी आपापल्या भागातील मुख्य शासकीय कार्यालयावर निदर्शने करतील, असा इशारा पठाण आणि सरचिटणीस प्रकाश बने यांनी दिलाय.