विरार : एका क्रूर बापानं आपल्या अवघ्या दीड वर्षांच्या चिमुरडीला तिच्या आईसमोरचं उलटं धरून तिचं डोकं जमिनीवर आदळल्यानं या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय.
विरार पूर्वमधल्या कारगील नगर इथल्या आशापुरी चाळ इथं ही धक्कादायक घटना घडलीय. तुषार संघवी असं या क्रूर बापाचं नाव आहे. पती - पत्नीच्या वादातून ही घडल्याचं सांगण्यात येतंय.
तुषार संघवी याचं दोन वर्षांपूर्वी आरतीशी लग्न झालं होतं. त्यांच्या संसारावर 'हस्ती' नावाचं फुलही फुललं होतं. पण, तुषार काही दिवसांपासून आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यानं आरतीला अनेकदा मारहाणही केली होती. याच त्रासाला कंटाळून आरतीनं मुलीला घेऊन आशापुरी चाळीत राहणाऱ्या आपल्या आईचं घर गाठलं.
अधिक वाचा - अमूलच्या या जाहिरातीत लिंगभेदाला स्थान आहे का?
सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास आरती आपल्या चिमुकलीला घेऊन दारात बसली होती. तुषार रागातच तिथं दाखल झाला... आणि त्यानं आरतीला मारहाण करण्यास सुरुवात केली... यावेळी, रागातच त्यानं आरतीच्या कुशीतून चिमुकल्या हस्तीला हिसकावून घेतलं... आणि आरतीच्या समोरचं त्यानं हस्तीला पायाला पकडून तिचं डोकं जमिनीवर आपटलं.
यामुळे, चिमुकली हस्त जागीच बेशुद्ध झाली... तिला तात्काळ हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं पण, मंगळवारी निष्पाप हस्तीनं अखेर प्राण सोडले.
या घटनेनं सगळा परिसरच हादरून गेलाय. निर्दयी पित्याविरोधात विरार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आलीय, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक आर. काबळे यांनी दिलीय. दरम्यान, तुषारला 'मुलगी' नको होती म्हणून जोडप्यात वारंवार वाद होत असत, असंही सांगण्यात येतंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.