शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर प्रश्नचिन्ह?

शिवाजी पार्कवर शिवसेनेची दसरा मेळाव्याची परंपरा यंदा कायम रहाणार? की खंडित होणार? याविषयी उत्सुकता आहे. पण, सुवर्ण महोत्सवात पदार्पण केलेल्या या पक्षानं या मेळाव्याच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरु केलीय.

Updated: Sep 30, 2015, 10:49 AM IST
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर प्रश्नचिन्ह? title=

मुंबई : शिवाजी पार्कवर शिवसेनेची दसरा मेळाव्याची परंपरा यंदा कायम रहाणार? की खंडित होणार? याविषयी उत्सुकता आहे. पण, सुवर्ण महोत्सवात पदार्पण केलेल्या या पक्षानं या मेळाव्याच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरु केलीय.

यंदा सत्तेत असलेल्या शिवसेनेन दसरा मेळाव्याची तयारी सुरु केलीय. सत्तेत असतानाही गर्दी जमावण्याचं आव्हान शिवसेना नेतृत्वापुढे आहे. त्यामुळे मेळाव्याच्या तीन आठवडे आधीच पक्षाच्या मुंबईतील पदधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना तयारीला लागण्याचे आदेश नेत्यांना दयावे लागलेत.

पक्षानं सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केलंय. वर्धापन दिनाचा सोहळा अतिवृष्टित वाहून गेल्यानं दसरा मेळाव्यात त्याची कसर भरुन काढली जाणार आहे. पण मेळाव्याच्या ठिकाणावरुन थोडा संभ्रम आहे. शिवाजी पार्क शांतता क्षेत्र म्हणून घोषित झालंय. 

पक्षाची परंपरा लक्षात घेत न्यायालयानेही गेली तीन वर्ष सहानुभूती दाखवत मेळाव्याला आवाजाची मर्यादा नेमून देत सशर्त परवानगी दिली होती. मात्र, आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन झाल्यानं मेळाव्याच्या आयोजकांविरोधात गुन्हा दाखल होऊन त्यांना आर्थिक दंडही ठोठावण्यात आलाय. 

त्यामुळे न्यायालय यंदा शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी देणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय. शिवाजी पार्कवर मेळावा आयोजनासाठी परवानगी न मिळाल्यास वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदान हा पर्याय शिवसेनेसमोर आहे. पण, नेते सध्यातरी शिवाजी पार्कसाठीच आग्रही आहेत. 

गेली 15 वर्ष विरोधी पक्षात असताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला मेळाव्यात लक्ष्य केलं जात होतं. आता कोणावर तोफ डागायची हाही मुद्दा आहेच!  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.