मनसेनेने मुंबईत उपलब्ध केली जेनरिक औषधे

‘सत्यमेव जयते`तील आमिर खानने टीव्हीच्या माध्यमातून रुग्णांना परवडतील अशी जेनरिक औषधे असल्याचे सांगितले होते. आता हीच जेनरिक औषधे मुंबईत उपलब्ध झाली आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घाटकोपरमध्ये जेनरिक औषध दुकानाचे सोमवारी उद्घाटन केले.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 15, 2013, 10:52 AM IST

www.24taas.com, मुंबई
‘सत्यमेव जयते`तील आमिर खानने टीव्हीच्या माध्यमातून रुग्णांना परवडतील अशी जेनरिक औषधे असल्याचे सांगितले होते. आता हीच जेनरिक औषधे मुंबईत उपलब्ध झाली आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घाटकोपरमध्ये जेनरिक औषध दुकानाचे सोमवारी उद्घाटन केले.
मनसे आणि जनाधार प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने घाटकोपरमधील माणिकलाल कम्पाऊंड येथे जेनरिक औषधांचे दुकान सुरू करण्यात आले आहे. राज ठाकरे यांनी या दुकानाचे उद्घाटन केले. यावेळी शर्मिला ठाकरे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजीराव नलावडे, आमदार शिशिर शिंदे, मंगेश सांगळे, राम कदम, नगरसेवक दिलीप लांडे उपस्थित होते.
दरम्यान, सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत रुग्णालयांसाठी औषधांची खरेदी जेनरिक (मूळ) नावाने केली जाते. या औषधांच्या वितरणासाठी परिमंडळ स्तरावर रिजनल वेअर हाऊस स्थापन करण्यात आली आहेत. जिल्हा स्तरावर जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिनस्त एकूण ७४ वेअर हाऊस स्थापन करण्यात आले आहे. या वितरण व्यवस्थेव्दारे जेनरिकची औषधे सर्व रुग्णालयांना पुरविण्यात येतात, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री सुरेश शेट्टी यांनी विधानपरिषदेत लेखी प्रश्नांच्या उत्तरात दिली होती.
याबाबत सुभाष चव्हाण, संजय दत्त, अलका देसाई यांनी प्रश्न विचारला होता. राज्यातील महिला बचतगटांच्या माध्यमातून जेनरिक औषधांचे मोबाइल दुकान सुरू करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे.

जेनरिक औषध म्हणजे काय?
औषधाचे मूळ (फार्माकॉलॉजी नेम) नाव म्हणजेच जेनरिक मेडिसीन होय. एकाच आजारावर विविध कंपन्यांची वेगवेगळ्या किमतीची औषधी मेडिकल स्टोअरवर उपलब्ध असतात. डॉक्टरांनी जेनरिक मेडिसीन लिहून दिल्यास रुग्ण त्याच्या बजेटनुसार औषधी खरेदी करू शकतो. अशा प्रकारचा जेनरिक मेडिसीनचा पर्याय राजस्थानमध्ये तेथील सरकारने सुरू केला आहे.
दरम्यान, विशिष्ट कंपनीऐवजी जेनरिक मेडिसीनच जर डॉक्टरांनी लिहून दिले तर रुग्णाला ते कमी किमतीत मिळू शकते. मात्र, मिळणाऱ्या लाभापोटी या ऐवजी विशिष्ट कंपन्यांचीच औषधी रुग्णांना लिहून देतात. त्यातून रुग्णांची आर्थिक पिळवणूक होत असल्याची माहिती समोर आल्याचे ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमातून अभिनेता आमिर खाने सांगितले होते.