मुंबई : भाजयुमोच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी झालेल्या गणेश पांडे याच्याकडे मनी, मसल पॉवर आहे. पांडेची पार्श्वभूमी गुन्हेगारी वृत्तीची आहे, असे सांगत गणेश पांडे आणि माझ्यासह सर्वांचीच ‘नार्को टेस्ट’ करा, असे खुले आव्हान भाजयुमोच्या पदाधिकारी मैथिली जावकर यांनी दिलेय.
गणेश पांडेविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मी आणि आई अश्या दोघीच राहतो. गणेश पांडेची पार्श्वभूमी गुन्हेगारी वृत्तीची आहे. त्याच्याकडे मनी, मसल पॉवर आहे. त्याच्याविरोधात तक्रार केली असती तर मी एकटी पडले असते. या भीतीमुळे मी आजवर पोलिसांत गेले नव्हते. गणेश पांडे मीडियासमोर खोटेनाटे सांगत आहे, मैथिली जावकर म्हटलेय.
मथुरा येथील मेळाव्यात अध्यक्ष गणेश पांडे याने अत्यंत एकदम असभ्य वर्तन केले. तो पॉर्न फिल्म लावून माझ्या नावाने हाका मारत होता. यावर तिथे उपस्थित असलेले सारे खी खी करून हसत होते, असे गंभीर आरोप करणारे पत्र महिला पदाधिकारी मैथिली जावकर यांनी पक्षश्रेष्ठींना लिहिल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर गणेश पांडे याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. मात्र तरीही पांडे हा खुलेआम बदनामी करीत सुटला आहे, असा आरोप करीत जावकर यांनी त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर वृत्तवाहिनीच्या माध्यमातून सर्वांसमोर येऊन त्यांनी आपली कैफियत मांडली.
जावकर यांनी मथुरेला ४ मार्च रोजी नेमके काय घडले ते सांगितले. तसेच याप्रकरणी कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. त्या म्हणाल्या, नार्को टेस्ट करण्यास माझी तयारी आहे. आधी माझी नार्को टेस्ट करा, गणेश पांडेची करा आणि तिथे उपस्थित असलेल्या सर्वांची करा. वीणा दिवेकर, योगेश गिरकर, हिमांशू पडवळ, अमित शेलार, अमोल जाधव, निर्मला यादव, सिद्धार्थ शर्मा या सर्वांचीच नार्को टेस्ट करा, असे त्या म्हणाल्यात.
विनयभंगाची घटना घडल्यानंतर इतक्या उशिरा तक्रार करण्याबाबत जावकर म्हणाल्या, मी आणि माझी आई अशा दोघीच आम्ही राहतो. आम्हाला दुसरा कोणाचा आधार नाही. गणेश पांडेची पार्श्वभूमी गुन्हेगारी वृत्तीची आहे. हेमंत पुजारी खटल्यात पांडेची दोन-तीन वेळा चौकशी झाली आहे. इतकेच नव्हे तर पोलिसाला मारहाण प्रकरणात एफआयआरही दाखल झाला आहे. त्याच्याविरोधात बोलायला इतर लोक घाबरतात. मीदेखील घाबरले. मात्र मुंबईत ८ मार्च रोजी महिला दिनाच्या एका कार्यक्रमात मी प्रमुख पाहुणी होते. त्यावेळी मी महिला सक्षमीकरणावर बोलले, पण नंतर माझीच मला लाज वाटली. त्यामुळे पहिल्यांदा मी पक्षाकडे तक्रार केली. आशीष शेलार यांनी आम्हा दोघांना कार्यालयात बोलावले. दोघांशी स्वतंत्र चर्चा केली. मग दोघांना एकत्र बसवून चर्चा केली. नंतर आशीष शेलार यांनी पांडे याचा राजीनामा मागितला. पक्षाने त्याचा राजीनामा घेतल्यामुळे मी शांत राहिले होते.
त्यानंतर पांडे वृत्तवाहिन्यांवरील मुलाखतीत धादांत खोटे बोलला. माझी बदनामी करत राहिला. आता फेसबुकवर माझ्यावर घाणेरड्या कमेंट केल्या जात आहेत. मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. मग मी गप्प का राहू? मी तक्रार दाखल करणारच. यापुढे कुठल्याही मुलीसोबत हा प्रकार व्हायला नको यासाठी हे पाऊल उचलले.