F1 ट्रॅकवरून आरोपांच्या गाड्या सुसाट!

दिल्लीजवळ ग्रेटर नोएडामध्ये जगातील सर्वोत्कृष्ट रेसिंग ट्रॅकपैकी तयार झालेल्या रेसिंग ट्रॅकवर यशस्वी स्पर्धा पार पडल्यानंतर आता महाराष्ट्रात या ट्रॅकवरून राष्ट्रवादीने काँग्रेसविरोधातील आरोपांची गाडी सुसाट सोडली आहे.

Updated: Oct 31, 2011, 11:21 AM IST

काँग्रेसच्या मुख्यंमत्र्यांवर भुजबळांचा आरोप

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

दिल्लीजवळ ग्रेटर नोएडामध्ये जगातील सर्वोत्कृष्ट रेसिंग ट्रॅकपैकी तयार झालेल्या रेसिंग ट्रॅकवर यशस्वी स्पर्धा पार पडल्यानंतर आता महाराष्ट्रात या ट्रॅकवरून राष्ट्रवादीने काँग्रेसविरोधातील आरोपांची गाडी सुसाट सोडली आहे.

 

गेल्या ३- ४ वर्षापूर्वी F1च्या प्रमुखांनी महाराष्ट्राशी संपर्क साधला होता. मात्र, त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याने महाराष्ट्रात आंतराराष्ट्रीय दर्जाचा F1 ट्रॅक बनू शकला नाही, अशी खंत महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.

 

भुजबळ यांनी खंत व्यक्त करताना गेल्या ३-४ वर्षांत राज्याच्या सत्तेवर असलेल्या विलासराव आणि अशोक चव्हाण या काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांकडे अप्रत्यक्ष बोट दाखवलं आहे. महाराष्ट्रात ट्रॅक बनविण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, मुंबई-पुण्याजवळ यासाठी जागा देण्याची इच्छा शक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवली नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

यापूर्वी गेल्या ३-४ वर्षांपासून एमएसआरडीसीच्या माध्यमातून रेसिंग ट्रॅक बनविण्याची चर्चा सुरू होती. या साठी दोन सल्लागार कंपन्यांचीही नेमणूक करण्यात आली होती. मात्र, कोणत्याही प्रकारची हालचाल न झाल्याने उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे अत्याधुनिक सोयी सुविधांनी सज्ज असलेला रेसिंग ट्रॅक झाल्याचे काल जगाने पाहिले आहे.