Exclusive: मुंबै बँकेत सुरू आहे 'गोलमाल'

'मुंबै बँके'मध्ये कसा गोलमाल सुरू आहे, याचा खळबळजनक गौप्यस्फोट झी 24 तासनं आज केलाय. आर्थिक क्षेत्रातल्या या अग्रगण्य बँकेतल्या मनमर्जी कारभाराचा पर्दाफाश आम्ही केलाय. तळे राखणारेच कसे पाणी चाखतात, याचं ढळढळीत वास्तव दाखवणारा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट...

Updated: Jan 15, 2015, 11:28 PM IST
Exclusive: मुंबै बँकेत सुरू आहे 'गोलमाल' title=

मुंबई: 'मुंबै बँके'मध्ये कसा गोलमाल सुरू आहे, याचा खळबळजनक गौप्यस्फोट झी 24 तासनं आज केलाय. आर्थिक क्षेत्रातल्या या अग्रगण्य बँकेतल्या मनमर्जी कारभाराचा पर्दाफाश आम्ही केलाय. तळे राखणारेच कसे पाणी चाखतात, याचं ढळढळीत वास्तव दाखवणारा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट...

मुंबै बँकेत सुरू आहे 'गोलमाल'

सहकार चळवळीला काळीमा फासण्याचा प्रकार

खिरापतीसारखी वाटली कोट्यवधींची कर्जे?

कोण आहेत यामागचे खरे सूत्रधार?

मुंबै बँकेत कुणी केला हा गोलमाल? त्याची मोडस ऑपरेंडी काय? सहकार खात्याच्या आणि नाबार्डच्या चौकशी अहवालात नेमकं काय सत्य मांडलंय? याचाच लेखाजोखा झी 24 तास आपणासमोर मांडतंय...

मुंबै बँकेनं नियम धाब्यावर बसवून आर्थिक स्थिती डबघाईला आलेल्या ५९ पतसंस्थांना तब्बल १२९ कोटी रूपयांची कर्जं वाटली, असं विविध चौकशी अहवालातून स्पष्ट झालंय. या पतसंस्थांनी बोगस सभासदांच्या नावं विशेषतः वाहन कर्ज दाखवून कर्ज रक्कम ऑटो डीलरच्या खात्यात जमा केली. या खात्यातून संबंधित पतसंस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी बेअरर चेकद्वारे पैशाची उचल केली. या कथित घोटाळ्याप्रकरणी पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा दीड वर्षापासून तपास करत असली तरी अद्याप चार्जशीट दाखल झालेली नाही. आतापर्यंत अनेक पदाधिकारी तुरुंगवारी करून आलेत, तर काहीजण अजूनही तुरुंगात आहेत. मुंबै बँकेनंही दोघा अधिकाऱ्यांना निलंबित करून कारवाईचा देखावा निर्माण केलाय.

रस्त्यावर भाजी विकणारी भाजीवाली, रिक्षा चालवून पोट भरणारा रिक्षाचालक अशांना सेक्रेटरी आणि अध्यक्ष बनवून पतसंस्था स्थापन करण्यात आल्या. बोगस कर्जदारांच्या नावानं कर्जं उचलण्यात आली. मुंबै बँकेतला हा कथित बोगस कर्जवाटप घोटाळा केवळ ५९ पतसंस्थांपुरता मर्यादित नाहीय. व्यक्तिगत कर्जवाटप करतानाही मुंबै बँकेनं नियम धाब्यावर बसवण्यात आले, असे गंभीर ताशेरे सहकार विभागाच्या चौकशी अहवालात तसंच नाबार्डच्या रिपोर्टमध्येही ओढण्यात आलेत. मुंबै बँकेच्या तपासणी अधिकाऱ्यांनी त्रुटी दाखवूनही संचालक मंडळानं अनेक पतसंस्थांना कोट्यवधींची कर्जे मंजूर केल्याची बाब उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे पुढे आलीय. मुंबै बँकेतल्या नोकर भरतीमध्येही संचालकांच्या नातेवाईकांचीच वर्णी लावण्यात आली. बँकेचे संचालक शिवाजीराव नलावडे यांचे चिरंजीव राजा नलावडेंना सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून भरती करून घेतले. आणि वर्षभरात नियम, निकष डावलून थेट मुख्याधिकारीपदी प्रमोशन देण्यात आले, असा ठपका सहकार विभागाच्या चौकशी अहवालात ठेवण्यात आलाय. मुंबै बँकेनं झी 24 तासला पाठवलेल्या खुलाशात या सर्व बाबींचा सपशेल इन्कार केलाय.

मुंबै बँकेसारख्या प्रथितयश संस्थेची बदनामी करण्याचा आमचा हेतू नाही. परंतु मनमर्जी कारभार करणाऱ्यांचा खरा चेहरा उघड व्हावा, हीच आमची तळमळ आहे. या शोध मोहीमेत कर्जबुडव्या पतसंस्थांची आणि मुंबै बँकेच्या संचालकांची बाजूही आम्ही दाखवणार आहेत. सरकारनं या प्रकाराची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर कडक कारवाई करावी, एवढीच झी २४ तासची माफक अपेक्षा आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.