मुंबई: धारावीत राहणाऱ्या शाळेत शिकणाऱ्या या मुलींनी भल्याभल्यांना थक्क करणारं काम केलंय. आशियातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी... चार भिंतींचा आसरा त्याला घर असं नाव.... इथला प्रत्येक दिवस संघर्षाचा.... पण संघर्ष करता करता जगणं सुंदर कसं करता येईल.... हे या बारा तेरा वर्षाच्या मुलींकडून शिकावं.... जिथं शिक्षणासाठीही बरंच झगडावं लागतं. त्याच वातावरणात राहणाऱ्या या मुलींनी मोबाईल अॅप्स तयार केलीयत.
इथंच राहणारी १३ वर्षांची अंशुचा मनीवाल.... या वस्तीमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्नही महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच अंशुचा आणि तिच्या टीमनं 'वुमेन फाइट बॅक' नावाचं एक अॅप तयार केलंय. एखादं संकट आलंच तर अॅपमधून संबंधितांना अलर्ट मिळतो आणि लोकेशनही समजतं. या अॅपमध्ये एक फीचर आहे... त्याला 'डिस्ट्रेस कॉल' असं म्हंटलं जातं. या फीचरला स्क्रीनवर टॅप केलं की एक आवाज येतो.
नववीत शिकणारी रोशनीही धारावीमध्येच एका छोट्याशा घरात राहते. या वस्तीतल्या बऱ्याचशा मुली शाळेत जात नाहीत. अशा मुलींसाठी रोशनीनं 'पढ़ाई मेरा हक' नावाचं एक अॅप बनवलंय.
धारावीतल्या काही मुलींनी 'पानी है जीवन है' आणि आरोग्याशी संदर्भातही काही अॅप्स तयार केलेत. विशेष म्हणजे या सगळ्या मुली गेल्या वर्षीच कॉम्प्युटर शिकल्यायत. सॅन फ्रॅन्सिस्को आणि मुंबईत काम करणारा फिल्ममेकर नवनीत रंजन यानं या मुलींना अॅप तयार करण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि आर्थिक मदतही केली.
यातली बरीचशी अॅप्स काही दिवसांतच 'गुगल प्ले स्टोर'मध्ये उपलब्ध होणार आहेत. या मुलींनी या अॅप्ससंदर्भातलं प्रेझेंटेशन अमेरिकन दुतावासातही दिलंय. तिथं त्यांचं कौतुकही झालं. आता ही अॅप्स इंटरनॅशनल टेक्नोवेशन कॉम्पिटिशनमध्येही पाठवण्याची तयारी सुरू आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.