इस्थर अनुह्या हत्येप्रकरणी चंद्रभान सानप दोषी

इस्थर अनुह्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयानं निकाल दिलाय. आरोपी चंद्रभान सानप दोषी ठरवण्यात आलं असून उद्या त्याला शिक्षा सुनावली जाणार आहे. 

Updated: Oct 27, 2015, 12:53 PM IST
इस्थर अनुह्या हत्येप्रकरणी चंद्रभान सानप दोषी title=

मुंबई: इस्थर अनुह्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयानं निकाल दिलाय. आरोपी चंद्रभान सानप दोषी ठरवण्यात आलं असून उद्या त्याला शिक्षा सुनावली जाणार आहे. 

जानेवारी महिन्यात इस्थरवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला होता. मे महिन्यात क्राईम ब्रँचने या प्रकरणी किल्ला कोर्टात आरोपपत्र दाखल केलं होतं. आरोपी चंद्रभान सानप या प्रकरणात आरोपी असून त्याच्यावर बलात्कार करणे, दरोडा, पुरावा नष्ट करणे, गंभीर दुखापत करणे असे गुन्हे लावण्य़ात आले होते. एकूण ५४२ पानांचं आरोपपत्र असून यात ७६ साक्षीदार तपासले गेलेत. 

मूळची आंध्र प्रदेशमधील असलेली इस्थर मुंबईत एका कंपनीत इंजिनिअर म्हणून काम करत होती. नाताळासाठी आंध्रप्रदेशातील आपल्या गावी गेलेली इस्थर सुट्टी संपल्यानंतर पाच जानेवारी २०१४ रोजी रेल्वेने ती मुंबईत परत आली. पहाटेच्या सुमारास कुर्ला टर्मिनस इथं उतरलेल्या इस्थरचा काहीच पत्ता लागत नव्हता. तब्बल दहा दिवसांनी तिचा मृतदेह कांजुरमार्ग ते भांडुप दरम्यान इस्टर्न एक्स्प्रेस वे लगतच्या झुडूपामध्ये अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला होता. स्टेशनवरील सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे तपास करत पोलिसांनी चंद्रभानला अटक केली. 

कुर्ला स्थानकात एकट्या असलेल्या इस्थरला चंद्रभान सानपनं गाठलं आणि आपण टॅक्सी चालक असल्याचं सांगत घरी सोडण्याचं आश्वासन दिलं. इस्थर त्याच्यासोबत जाण्यास तयार झाल्यावर त्यानं एका निर्जन स्थळी गाडी थांबवून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र इस्थरनं त्याला विरोध करताच त्यानं तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह भांडूप जवळच्या झाडाझुडपांत टाकून दिला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.