मुंबई: अंडरवर्ल्ड डॉन दाउद इब्राहिमचा राइट हँड शकील शेख उर्फ छोटा शकीलनं दावा केलाय की, छोटा राजनची अटक त्याच्यामुळे झालीय. इंग्रजी वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, छोटा शकीलनं छोटा राजनच्या अटकेमागे आपला हात असल्याचं म्हटलंय. सोमवारी इंडोनेशियाच्या बाली इथं छोटा राजनला अटक करण्यात आली.
आणखी वाचा - छोटा राजन अटकेत आता गँगचा म्होरक्या कोण?
शकीलनं इंग्रजी वृत्तपत्राशी बोलतांना स्पष्ट केलं की, छोटा राजनच्या अटकेमुळं तो खूश नाहीय. कारण त्याला ठार मारायचं आहे. २००० साली छोटा शकीलच्या नेतृत्वात दाउद इब्राहिमच्या माणसांनी बँकॉकच्या हॉटेलमध्ये पिझ्झा डिलिव्हरी बॉय बनून छोटा राजनवर गोळीबार केला होता. या हल्ल्यात छोटा राजन गंभीर जखमी झाला होता. पण तो वाचला आणि हॉस्पिटलमधून पळून जाण्यातही यशस्वी झाला.
छोटा शकील म्हणाला, "माझी मुलांनी गेल्या आठवड्यात फिजीमध्ये छोटा राजनचा पत्ता शोधला होता म्हणून तो इंडोनेशियात पळाला. इंडोनेशियामध्ये त्याची अटक म्हणूनच होऊ शकली. मात्र डी-कंपनी त्याच्या अटकेनं नाराज आहे. मी त्याला ठार मारूनच दम घेईल आणि जोपर्यंत हे काम होत नाही, तोपर्यंत मी आराम करणार नाही."
आणखी वाचा - छोटा राजनला झाली अटक पण तो हसतोय...
शकीलनं पुढे सांगितलं, "आम्हाला भारत सरकारवर विश्वास नाही. भारत सरकारनं छोटा राजनचे नेहमीच लाड केले आहेत आणि आमच्या विरुद्ध त्याची मदत घेतलीय. छोटा राजनला भारताच्या ताब्यात देण्यात येवो किंवा सोडण्यात येवो आम्हाला त्याची काळजी नाही. मी त्याला सोडणार नाही, तो कुठेही असो..."
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.