<B> <font color=red> सुविधांसोबत नोकरीच्याही संधी; मध्य रेल्वेचा नवीन फंडा!</font></b>

लवकरच रेल्वे स्टेशनवर ‘स्टेशन तिकीट बुकिंग सिस्टिम’ ही नवी प्रणाली तुम्हाला दिसणार आहे. छोट्या छोट्या स्टेशन्सवरही लांब पल्ल्यांच्या गाड्यांची तिकीटं प्रवाशांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं मध्ये रेल्वेनं हे पाऊल उचललं आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 10, 2013, 11:25 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
लवकरच रेल्वे स्टेशनवर ‘स्टेशन तिकीट बुकिंग सिस्टिम’ ही नवी प्रणाली तुम्हाला दिसणार आहे. छोट्या छोट्या स्टेशन्सवरही लांब पल्ल्यांच्या गाड्यांची तिकीटं प्रवाशांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं मध्ये रेल्वेनं हे पाऊल उचललं आहे. मुख्य म्हणजे या प्रणालीनुसार प्रवाशांना तिकीटं देण्यासाठी कंत्राटी कर्मचारीही नेमण्यात येणार आहेत. म्हणजेच यातून तरुणांना रोजगारही उपलब्ध होणार आहे.
या प्रणालीमुळे छोटय़ा स्थानकांवरील स्टेशन मास्तरांचा भार कमी होण्याची शक्यता आहे. भरती करण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना तिकीट विक्रीतून काही टक्के वाटा मानधन म्हणून देण्यात येईल. ही योजना ११ स्थानकांवर राबवण्यात येणार आहे. या योजनेनुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपयांच्या तिकीट विक्रीसाठी १५ टक्के, १५ ते २० हजार रुपयांच्या तिकीट विक्रीसाठी १२ टक्के आणि ५० हजार ते एक लाख रुपयांच्या तिकीट विक्रीसाठी ४ टक्के वाटा मिळणार आहे. हे कंत्राटी कर्मचारी खंडाळा, कामण रोड, खारबांव, आपटा, जिते, सोमाटणे, पेण, नागोठणे, निळजे आणि तळोजा या स्थानकांवर तिकीट विक्री करतील.
लांब पल्ल्यांच्या मार्गावरील छोटय़ा स्थानकावर स्टेशन मास्तरला तिकीट देणे, स्थानकाची जबाबदारी सांभाळणे, आरक्षण चार्ट तपासणे, प्रसाधनगृहाची किल्ली सांभाळणे असे अनेक व्याप असतात. त्यामुळे तिकीट घेण्यासाठी आलेल्या प्रवाशांची गैरसोय होते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
कंत्राटी कर्मचाऱ्यांची नेमणूकीसाठी जाहिरात देण्यात येईल. त्यानंतरच यांची नेमणूक करण्यात येईल, असं मध्य रेल्वेचे प्रमुख जनसंपर्क अधिकारी अतुल राणे यांनी स्पष्ट केलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.