www.24taas.com,झी मीडिया, मुंबई
भ्रष्टाचाराचं मूळ निवणुकीत असल्याचा अजब दावा भाजप नेते गोपीनाथ मुंडेंनी केलाय. काही वर्षांपूर्वी आपण काही हजारांत निवडणूक लढायचो. आता मात्र खासदारकीच्या निवडणुकीत आपल्याला आठ कोटी रुपये खर्च करावे लागल्याचा गौप्यस्फोट मुंडेंनी केला.
निवडणूक आयोगानं कारवाई केली तरी आपल्याला पर्वा नाही. मात्र निवडणुकीत काळ्या पैशांचा बेसुमार वापर होत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. मुंडे यांच्या या गौप्यस्पोटामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, निवडणूक आयोग या विधानाची दखल घेऊन कारवाई करेल का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय.
काळ्या पैशांचा निवडणुकीत वापर थांबवायचा असेल, तर निवडणूक लढवण्याचा खर्च सरकारी तिजोरीतून व्हावा, अशी मागणी गोपीनाथ मुंडे यांनी केली आहे. निवडणुका लढवतांना मोठ्या प्रमाणात काळ्या पैशांचा वापर होतो, यामुळे सर्वसामान्यांना लोकशाहीत निवडणूक लढवणे कठीण झाले आहे, असा दावाही त्यांनी केलाय.
स्वीस बँकेत जगभरातून येणाऱ्या पैशात भारतीय काळ्या पैशाचा सर्वाधिक सहभाग आहे. मी १९८० साली पहिल्यांदा आमदारकीची निवडणूक लढवली होती, तेव्हा मला २९ हजार रूपये खर्च आला होता. त्यापैकी २२ हजार रूपये मला आले होते. म्हणून मला त्यावेळी खऱ्या अर्थाने ७ हजार रूपये खर्च आला होता, असंही मुडेंनी स्पष्ट केलंय.
मला लोकसभेत खासदार होण्यासाठी मला, ८ कोटी रूपये खर्च आला. म्हणून या काळ्या पैशांचा निवडणुकात वापर थांबवायचा असेल, तर सरकारी तिजोरीतून निवडणूक लढवण्याचा खर्च देण्यात यावा, अशी मागणी मुंडे यांनी मुंबईत एका कार्यक्रमात केली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.