मुंबई : ड्रग्ज माफिया बेबी पाटणकर हिच्या संपर्कात असणाऱ्या बरिष्ठ पोलीस निरीक्षकासह पाच पोलिसांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास गोखले, पोलीस निरीक्षक गौतम गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सुधाकर सारंग, सहाय्यक उपनिरीक्षक ज्योतीराम माने आणि हेड कॉन्स्टेबल यशवंत पराते यांचा समावेश आहे.
मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्याचे तत्कालीन कॉन्स्टेबल धर्मराज काळोखे याच्याकडे लाखो रुपयांचा एमडी ड्रग्ज सापडले होते. याप्रकरणी त्याला अटक झाल्यानंतर बेबी पाटणकरचेही नाव समोर आले होते. काळोखेला हे ड्रग्ज बेबी पाटणकरने दिल्याचे स्पष्ट होताच मरीन ड्राइव्ह पोलिसांनी तिलाही अटक केली आहे.
धर्मराज काळोखे याला हाताशी घेऊन अमली पदार्थाची तस्करी करणार्या आणि ४० दिवस गुंगारा देणार्या शकुंतला ऊर्फ बेबी पाटणकरला समाजसेवा शाखेच्या अधिकार्यांनी पनवेल येथे पकडले होते. तिला अटक करण्यात आली. बेबी सापडल्यामुळे एमडी म्हणजेच ‘म्याव म्याव’च्या तस्करीतील मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली गेली होती.
काळोखे याच्या लॉकरमध्ये १२ किलो एमडी आणि परदेशी चलन असा सुमारे सव्वादोन कोटींचा मुद्देमाल सापडला. समाजसेवा शाखेचे पोलीस उपायुक्त प्रवीण पाटील यांना बेबी एका लक्झरी बसने कुडाळहून मुंबईत येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पनवेलजवळ सापळा लावून बेबीला पकडले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.