कृष्णात पाटील, मुंबई : मागण्या मान्य करण्यासाठी रहिवासी डॉक्टरांची संघटना मार्डने पुकारलेल्या संपाने एका चिमुरड्याचा बळी घेतला आहे. बालकाला वेळत उपचार न मिळाल्याने त्याला जीव गमवावा लागला.
उल्हासनगरहून दोन दिवसांपूर्वी केईएममध्ये दाखल झालेल्या ६ महिन्यांच्या चिमुरड्यावर संपकाळात एकाही डॉक्टरनं उपचार केले नाहीत. त्यामुळे त्याला अखेर आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केलाय.
मोहम्मद साहिल असं त्या दुर्दैवी चिमुरड्या बाळाचं नाव आहे. ३५ ते ४० टक्के भाजल्यानं त्याला उपचारासाठी केईएममध्ये दाखल करण्यात आलं होतं. मार्डच्या संपामुळं त्याचा बळी गेला असताना, डॉक्टर मात्र आता उलटा कांगावा करत आहेत. १५ टक्क्यांपेक्षा जास्त भाजलेली मुले सहसा जगत नाहीत, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
दरम्यान, मार्ड संपामुळे चिमुकल्याचा बळी गेल्यानंतरही प्रशासन मात्र स्थिती नियंत्रणात असल्याचा दावा करत आहे. त्या बाळावरही योग्य उपचार सुरू असल्याचं BMC मेडिकल कॉलेजेसच्या संचालिका डॉ. सुहासिनी नागदा यांनी म्हटलंय.
मार्डचा संप सुरू असताना रुग्णालयांचा वर्किंग स्टाफ, प्राध्यापक आदींमार्फत रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा दावा नागदा यांनी केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.