`बेस्ट`च्या भोंगळ कारभाराचा वीजग्राहकांना भुर्दंड!

तुमचं या महिन्याचं अव्वाच्या सव्वा वीजबील पाहून तुम्हालाही धक्का बसला असेल तर चक्रावून जाऊ नका... गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला बेस्टच्या भोंगळ कारभाराचा हा तुम्हाला बसलेला फटका असू शकतो.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 24, 2013, 12:15 AM IST

www.24taas.com,
शुभांगी पालवे,
झी मीडिया, मुंबई

तुमचं या महिन्याचं अव्वाच्या सव्वा वीजबील पाहून तुम्हालाही धक्का बसला असेल तर चक्रावून जाऊ नका... गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला बेस्टच्या भोंगळ कारभाराचा हा तुम्हाला बसलेला फटका असू शकतो.
गणपती गेले आणि दिवाळसण तोंडावर आला असतानाच बेस्ट प्रशासनानं तुम्हाला अव्वाच्या सव्वा बील ‘बृहन्मुंबई इलेक्ट्रीक सप्लाय अॅन्ड ट्रान्सपोर्ट’कडून अनेक जणांना मिळाले आहेत. तुम्ही वीज चोरी केली नसेल तरी तुमच्या बीलात मात्र वीजचोरीचा उल्लेख करून तुमच्याकडून भरमसाठ रकमेची मागणी केलेली असू शकते किंवा तुमचा मीटर नादुरुस्त असल्यानं तुम्हाला हे बील भरावं लागेल अशी उत्तरंही तुम्हाला बेस्ट प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून मिळू शकतात. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अनेकदा अॅव्हरेज रिडींगवरून ग्राहकांना बील पाठवली जातात. वाढीव बील तुम्ही भरल्यानंतर ते ग्राहकांच्या क्रेडीटमध्ये राहतं. त्यामुळे पुढच्या काही महिन्यांत पुढच्या बीलांत ती रक्कम वळवली जाते. परंतु, या प्रक्रियेसाठी कमीत कमी सहा महिन्यांचा कालावधी लागतो, असंही बेस्टच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय.

काही ग्राहकांनी या बिलांवर आक्षेप घेतल्यावर तुमच्या मीटरमध्ये इतर कुणीतरी वायर्स टाकून वीज चोरली असेल, अशी उत्तरंही मिळतात. यासंबंधी आत्तापर्यंत ‘बेस्ट’ प्रशासनाकडे अनेक तक्रारी दाखलही झाल्या आहेत. त्यामुळे गेले अनेक दिवस बेस्टच्या ग्राहक तक्रार निवारण केंद्रांसमोर ग्राहकांची मोठी रांगही लागताना दिसतेय.

‘तुम्ही वापर केला नसतानाही तुम्हाला भरमसाठ बील मिळालं असेल तर तुम्ही याबद्दल संबंधित बेस्ट कार्यालयाशी संपर्क साधून तुमची तक्रार नोंदवू शकता... संबंधित अधिकारी त्यावर तात्काळ कारवाई करत तुम्हाल वीजबिलात कपात करून देतील. त्यामुळे तुमची चूक नसताना तुम्हाला भरमसाठ बील भरावं लागणार नाही...’ असं बेस्टच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.