लोकसभा निवडणुकीवर मनसेची व्यूहरचना

दिनेश दुखंडे, झी मिडिया, मुंबई नरेंद्र मोदींची लोकप्रियता आणि आम आदमी पार्टीच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणुकीत काय पवित्रा घेणार याबाबत उत्सुकता आहे.

Updated: Jan 3, 2014, 11:04 PM IST

दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई
नरेंद्र मोदींची लोकप्रियता आणि आम आदमी पार्टीच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणुकीत काय पवित्रा घेणार याबाबत उत्सुकता आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीची व्यूहरचना आखण्यासाठी आज कृष्णकुंजवर महत्त्वाची बैठक घेतली. राज ठाकरे सध्या तरी `एकला चालो रे...`च्या मनस्थितीत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

लोकसभा निवडणुका तोंडावर
लोकसभेसाठी मनसेची व्यूहरचना काय?
राज ठाकरे काय भूमिका घेणार?

गेल्या लोकसभा निवडणुकीत उपद्रव मूल्य दाखवणारी राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना 2014 च्या रणसंग्रामात काय पवित्रा घेणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचलीय. लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपापली मोर्चेबांधणी सुरु केलीय.
मनसेमध्येही या निवडणुकीची व्यूहरचना आखण्यास सुरूवात झालीय. त्यासाठी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज त्यांच्या निवासस्थानी प्रमुख पदाधिका-यांशी सविस्तर चर्चा केली.
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींची लोकप्रियता आणि देशाच्या राजकारणात आम आदमी पार्टीचा वाढता प्रभाव याची दखल सर्वच राजकीय पक्षांना घ्यावी लागतेय.
मनसेही त्याला अपवाद नाही. त्याच अनुषंगानं आज राज ठाकरेंनी आपल्या पदाधिका-यांची मतं जाणून घेतल्याची माहिती मनसे गटनेते बाळा नांदगांवकर यांनी दिली.
मनसेपुढील नेमके पर्याय
लोकसभा निवडणुकीत स्वबळावर उमेदवार उभे करणं
---------
नरेंद्र मोदींशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध पाहाता शिवसेना-भाजप-रिपाई महायुतीत सामील होणं
----------
थेट महायुतीत सहभागी न होता, निवडक जागांवर मैत्रीपूर्ण समझोता करणं
-----------
महायुतीत शिवसेना भाजपचं 22 -26 हे जागावाटपाचं सूत्र नक्की झालंय...दोन्ही पक्षांना मिळून रामदास आठवलेंच्या रिपाइंलाही जागा द्यायच्या आहेत.
एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे राज आणि उद्धव ठाकरेंशी मैत्रीपूर्ण संबंध असले तरी राज यांना महायुतीत सामावून घेण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतलेला नाही.
राष्ट्रीय जबाबदारी स्वीकारल्यानंतर अनेकदा मुंबई भेटीवर आलेल्या मोदींनी राज ठाकरेंशी संपर्क साधणं उचित मानलं नाही. तर दुसरीकडे राज यांनीही मोदींना महत्त्व दिलेलं नाही. त्यामुळे ना मनसेची महायुतीत येण्याची इच्छा आहे, ना शिवसेना पुन्हा मनसेला टाळी देण्यास उत्सुक आहे.
महायुतीत सामील झाल्यास राज्यात मनसेची वाढ खुंटेल अशी भीतीही नेत्यांना आहे. लोकसभा निवडणुकीतल्या या समझोत्याची विधानसभा निवडणुकीत किंमत मोजावी लागेल, याची पक्षाच्या नेत्यांना पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे राज्यातील सद्यपरिस्थितीचा आढावा घेऊन स्वबळावरच लोकसभा निवडणूक लढवण्याची मनसेची तयारी असल्याची माहिती मिळतेय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.