www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
काकांच्या छत्राखालून बाहेर पडून धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी पुन्हा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांनीच बाजी मारलीय पण, राष्ट्रवादीच्या तिकिटावर...
गोपीनाथ मुंडे यांच्याशी मतभेद झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या विधान परिषदेच्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर या जागेसाठी पुन्हा एकदा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभं राहिलेल्या धनंजय मुंडे यांनी काका गोपीनाथ मुंडे यांच्या नाकावर टिच्चून आपला विजयाचा झेंडा फडकावलाय.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय मुंडे यांना या निवडणुकीत १६५ मतं मिळाली तर अपक्ष उमेदवार पृथ्वीराज काकडे यांना १०६ मतं मिळाली. धनंजय मुंडे यांचा विजय होऊ नये, यासाठी काका आपला सगळा जोर लावत असल्याची चर्चा रंगली होती. तर धनंजय मुंडे यांच्यापाठिशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हात होता. या निवडणुकीत केवळ विधानसभेचे आमदार मतदान करणार असल्यानं धनंजय मुंडे यांचा विजय निश्चित मानला जात होता.
धनंजय मुंडे यांनी या निवडणुकीत आपलं वर्चस्व सिद्ध केलं असलं तरी आघाडीची मतं फोडण्यात गोपीनाथ मुंडेंना मात्र यश मिळालंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.