मुंबई : पाचशे आणि एक हजाराच्या जुन्या नोटांवर बंदी घालून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात आर्थिक आणीबाणी लावल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. मोदींच्या नोटबंदीच्या निर्णयाचं आम्ही स्वागत केलं. या निर्णयामुळे भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाला आळा बसेल असं मोदी म्हणाले होते, पण यामध्ये सामान्यांनाच त्रास होत असल्याचंही पवार म्हणाले.
देशात जे चालू आहे त्यामुळे सामान्य माणसांचे जगणं मुश्किल झालं आहे. येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीतही परिवर्तन करावं लागेल असं वक्तव्यही पवारांनी केलं.
बुलेट ट्रेनच्या मुद्द्यावरूनही पवारांनी मोदींना लक्ष्य केलं. ९८ हजार कोटीत मुंबई, दिल्ली, कलकत्ता,चेन्नई या सर्व ठिकाणच्या ट्रेन धावू शकतात, पण मोदींना अहमदाबादला जायची घाई लागली आहे, असा टोला पवारांनी लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मुंबईतल्या घाटकोपर इथे परिवर्तन सभेच आयोजन केलं होतं. या सभेत बोलताना शरद पवारांनी नरेंद्र मोदींच्या नोटबंदीच्या निर्णयावर टीकास्त्र सोडलं.