मुंबई : मुंबई महापालिका सभागृहात आज पुन्हा एकदा राडा झाला. गेल्या चार दिवसांपासून मुंबई पालिकेत फक्त राडेबाजीच सुरुच आहे. आज काँग्रेसच्या आणखी ६ नगरसेवकांचं शिट्टी वाजवली म्हणून एका दिवसासाठी निलंबन करण्यात आलं.
निलंबन नगरसेवकांमध्ये यात ललिता यादव, गीता यादव, सागरसिंह ठाकूर, योगेश भोईर, ब्रायर मिरांडा आणि शिवानंद शेट्टी या नगरसेवकांचा समावेश आहे. यावेळी शिवसेना आणि काँग्रेसचे नगरसेवक एकमेकांशी भिडले. सेना नगरसेवक राजू पेडणेकर आणि काँग्रेस नगरसेवक प्रवीण छेडा यांच्यात जोरदार धक्काबुक्की झाली.
शिवसेना आणि काँग्रेसच्या महिला नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमकी उडाल्या. विशेष म्हणजे याआधीही ६ नगरसेवकांना सभागृहात गोंधळ घातल्याच्या आरोपावरून निलंबित करण्यात आलं होतं. लोकांची कामं करण्यासाठी नगरसेवक महापालिकेत जातात की, राडे करायला? हेच आता कळेनासं झालंय. त्यांची ही दादागिरी आणि राडेबाजी पाहिल्यानंतर कालचा गोंधळ बरा होता, असंच म्हणायची वेळ मुंबईकरांवर आलीय...
राडेबाज नगरसेवक
मुंबई महापालिकेत गेल्या चार दिवसांपासून नुसती राडेबाजी सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नगरसेवक यांच्यात ही धुमश्चक्री रंगलीय. एकमेकांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ करण्यापर्यंत त्यांनी मजल मारलीय. त्यामुळं यांना नगरसेवक म्हणायचं की राडेबाज? असा प्रश्न निर्माण झालाय...
१ दिवस : सभागृहात गोंधळ
नगरसेवकांच्या निधीवाटपावरून महापालिका सभागृहात गोंधळ झाला. सत्ताधारी शिवसेना-भाजपनं आपल्याच नगरसेवकांना जादा निधी दिल्याच्या आरोपावरून विरोधी सदस्यांनी सभागृह डोक्यावर घेतलं. त्यामुळं महापालिकेचं कामकाज होऊ शकलं नाही.
२ दिवस : विरोधकांच्या घोषणाबाजीने गोंधळ
स्वाइन फ्लूबाबत निवेदन करू न दिल्याच्या कारणावरून विरोधकांनी घोषणाबाजी करत सभागृहात जोरदार गोंधळ घातला. विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी स्वाईन फ्लूवर निवेदन करण्याची परवानगी मागितली. मात्र 12 मार्चला याबाबत विशेष सभा दिल्याचे कारण देत महापौर स्नेहल आंबेरकर यांनी परवानगी नाकारली. त्यावरून गोंधळाला सुरूवात झाली. महापौरांच्या वादग्रस्त वक्तव्याचा धागा पकडून, विरोधकांनी 'झाडे लावा, स्वाईन फ्लू घालवा', अशा घोषणा दिल्या. यामुळं संतापलेल्या महापौरांनी काँग्रेसच्या 6 नगरसेवकांना 15 दिवसांसाठी निलंबित केलं.
३ दिवस : सभागृहाबाहेरही राडेबाजी
सभागृहात गोंधळ घालणा-या नगरसेवकांनी तिस-या दिवशी चक्क सभागृहाबाहेरही राडेबाजी केली. नगरसेवकांचं निलंबन मागे घेण्यासाठी महापौरांच्या केबिनबाहेर काँग्रेस नगरसेवकांनी राडा केला. त्यानंतर विरोधी पक्षनेत्यांनी सभागृहात दिलगिरी व्यक्त करूनही, निलंबन मागे न घेतल्यानं, निलंबित नगरसेविकांनी सभागृहात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षारक्षकांशी त्यांची धक्काबुक्कीही झाली. स्वाईन फ्लूचा मुद्दा राहिला बाजूला, महापालिका सभागृहात गोंधळाचं वेगळंच महाभारत रंगलं...
४ दिवस : नगरसेवकांनी राडेबाजी
राडेबाजीचा अध्याय मागील पानावरून पुढं सुरूच राहिला. लागोपाठ चौथ्या दिवशी नगरसेवकांनी राडेबाजी केली. शिट्टी वाजवली म्हणून काँग्रेसच्या आणखी 6 नगरसेवकांना शुक्रवारी निलंबित करण्यात आलं. यावेळी शिवसेना आणि काँग्रेसचे नगरसेवक एकमेकांशी भिडले...सेना नगरसेवक राजू पेडणेकर आणि काँग्रेस नगरसेवक प्रवीण छेडा यांच्यात जोरदार धक्काबुक्की झाली... शिवसेना आणि काँग्रेसच्या महिला नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमकी उडाल्या... नगरसेवकांची ही राडेबाजी पाहिल्यानंतर कालचा गोंधळ बरा होता, असंच म्हणायची वेळ मुंबईकरांवर आलीय, एवढं नक्की...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.