www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईत नेहमीप्रमाणं यंदाही पावसाळ्यात साथीचे रोग पसरण्यास सुरुवात झाली असून अनेक मुंबईकर यामुळं आजारी पडले आहेत. मुंबई महापालिकेच्या आणि खाजगी रुग्णालयांमध्ये सध्या साथीच्या रोगामुळं आजारी पडलेल्या रुग्णांची गर्दी दिसून येतंय.
पावसाळ्यात मुंबईकरांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी मुंबई महापालिका मोठ्या प्रमाणात जनजागृती करतंय. परंतु जनतेला आरोग्य जपण्याचा सल्ला देणा-या मुंबई महापालिकेकडूनच अनेक भागात दुषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचं समोर आलंय. त्यामुळं मुंबईत अनेकजण साथीच्या रोगांनं त्रस्त झालेत. मुंबई महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये जून महिन्यात गॅस्ट्रोचे ८३३. तापाचे २६३०, मलेरियाचे ६०९, कावीळीचे ५९ आणि टायफॉईडचे ५३ रुग्ण आढळून आलेत. ही आकडेवारी केवळ बीएमसीच्या रुग्णालयांमधील आहे. खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या रुग्णांची संख्या यापेक्षा अधिक असू शकते.
पावसाळ्यात साथीचे रोग पसरणं हे मुंबईकरांसाठी नवीन नाही. हे आजार जास्तीत जास्त पाण्यापासून पसरणारे असल्यामुळं तुमच्या भागात दुषित पाणी येत असल्यास किंवा पाण्याला वास येत असल्यास तात्काळ पालिकेच्या वॉर्ड ऑफिसला कळवा. पाणी उकळून प्या, उघड्यावरचे अन्नपदार्थ खाणं टाळा, या दिवसांमध्ये जादा पिकलेली फळे खावू नका. असं आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागानं केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.