आमदार, मंत्र्यांचे पगार वाढवण्याच्या हालचालींना वेग

महाराष्ट्रातील मंत्री आणि आमदारांचे पगार पुन्हा वाढणार असं दिसतंय... त्यासाठी आवश्यक त्या हालचालींनाही वेग आलाय. 

Updated: Aug 5, 2016, 11:45 AM IST
आमदार, मंत्र्यांचे पगार वाढवण्याच्या हालचालींना वेग title=

मुंबई : महाराष्ट्रातील मंत्री आणि आमदारांचे पगार पुन्हा वाढणार असं दिसतंय... त्यासाठी आवश्यक त्या हालचालींनाही वेग आलाय. 

आमदार, मंत्री आणि राज्य मंत्री यांच्या मानधन वाढवण्यासंदर्भात उपसमिती गठीत करण्यात आलीय. मंत्री आणि आमदारांचे पगार हे उपसचिव - सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या समकक्ष असावे याबाबत अहवाल तयार करण्यासाठी एक समिती नेमण्याचा निर्णय राज्य मंत्री मंडळाने घेतलाय.
 
संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली ही उपसमिती काम करणार आहे. या समितीत गिरीश बापट, सुधीर मुनगुंटीवार यांचाही सहभाग असेल. 

सचिवदर्जाच्या अधिकाऱ्याचे पगार वेतन भत्ते वाढत असतात, पण आमदारांचे वेतन भत्तेवाढ शासनाच्या मर्जीवर अवलंबून असते... यामुळे उपसचिव अथवा सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांचे पगार आमदारांपेक्षा अधिक झालेत. या शासकीय अधिकाऱ्यांचे पगार भत्ते जसे वाढतील त्याचबरोबर आमदार आणि मंत्र्यांचे पगार भत्ते वाढतील अशी मागणी आहे, त्याचा अभ्यास करण्यासाठी ही समिती आढावा घेणार आहे.