मुंबई : आपल्या घरी लवकर जाण्यासाठी बहुतांशी चाकरमानी विशेषतः दूरवर राहणारे फास्ट ट्रेन मिळावी यासाठी धडपड करत असतात. पण फास्ट ट्रेनचा मोह एका मोटरमनलाही झाला आणि या गडबडीत तो लोकलचे ब्रेक लावायलाच विसरला आणि ट्रेन थेट चर्चगेट स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर चढवली.
काही दिवसांपूर्वी चर्चगेट रेल्वे स्थानकावर झालेल्या अपघाताप्रकरणी चौकशी अहवाल पश्चिम रेल्वेच्या जीएमकडे सोपवण्यात आला आहे. 50 पानी अहवालामध्ये या अपघाताप्रकरणी मोटरमन एल.एस. तिवारी यांना संपूर्णपणे दोषी ठरवण्यात आलं आहे.
चौकशी अहवालानुसार अपघाताच्या दिवशी लोकल चर्चगेट स्थानकात येत असताना तिवारी यांनी ब्रेक लावले नाहीत. या अपघातावेळी शेजारच्या स्थानकावर विरारला जाणारी गाडी उभी होती. त्यामुळे घरी जाण्याच्या घाईत असलेल्या तिवारींनी लोकल स्थानकात येत असताना ब्रेक लावले नाहीत.
याचसोबत गाडी स्थानकात प्रवेश करत असताना तिवारींनी आपली लोकल ड्रायव्हिंगची सर्व साधनसामुग्री तशीच सोडून आपलं सामान आवरायला लागले. त्यामुळे तिवारींच्या याच हलगर्जीपणामुळे हा अपघात घडल्याचं समोर येत आहे.
आता तिवारी यांच्यावर काय कारावाई होणार हे रेल्वे अधिकाऱ्यांनी अजून गुलदस्त्यात ठेवले आहे.