कांद्याचं उत्पादन वाढलं, 22 टन परदेशी कांदा सडला

व्यापाऱ्यांना साठेबाजी कशी महागात पडू शकते, याचं उदाहरण नवी मुंबईतच्या एपीएमसी मार्केटमध्ये पाहायला मिळतंय. 

Updated: Oct 13, 2015, 07:26 PM IST
कांद्याचं उत्पादन वाढलं, 22 टन परदेशी कांदा सडला title=

स्वाती नाईक, नवी मुंबई : व्यापाऱ्यांना साठेबाजी कशी महागात पडू शकते, याचं उदाहरण नवी मुंबईतच्या एपीएमसी मार्केटमध्ये पाहायला मिळतंय. 

राज्यात कांद्याचं नवीन पिक आल्यानं इजिप्तवरून आयात केलेल्या कांद्याची मागणी घटलीय. त्यामुळे, हा भारतात दाखल झालेला जवळपास 22 टन कांदा सडत पडलाय. 

काही दिवसांपर्यंत, राज्यात दुष्काळगस्त परिस्थितीचा फटका कांद्या उत्पादनावर बसल्याने कांद्याची आवक कमालीची घटल्याचं सांगण्यात येत होतं. नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये कांद्याची आवक घटल्याने नेहमी 15 ते 25 रूपये किलो विकला जाणारा कांदा शंभरीच्या घरात पोहचला होता. कांद्याची वाढलेले दर पाहून एपीएमसी मार्केटमधील काही व्यापाऱ्यांनी इजिप्तमधून कांद्याची आवक करण्यास सुरुवात केली होती. इजिप्तमधून आलेल्या कांद्यामुळे एक महिन्यांपूर्वी वाढलेले कांद्याचे दर कमी होण्यास मदत झाली. होलसेल मर्केटला 80 रूपयाला पोचलेला कांदा 40 ते 50 रूपयांपर्यंत खाली आला.

राज्यातील नवीन कांद्याची आवक गेल्या महिनाभरापासून वाढल्याने दर 30 रुपये झाले आहेत. त्यातच इजिप्तच्या कांद्याच्या मानाने स्थानिक कांदा बारीक असल्याने लोकांनी आपल्या कांद्याला पसंती देण्यास सुरुवात केली आहे. या कारणांमुळे इजिप्तचा कांदा विकला जात नाही.

त्यातच इजिप्तवरून भारतातील मार्केटमध्ये दाखल होण्यासाठी 20 ते 22 दिवसाचा कालावधी लागतो. या प्रवासात तो डीप फ्रिजरमध्ये असतो... तो मार्केटमध्ये आल्यावर उघड्यावर ठेवण्यात येतो. उघड्यावर ठेवल्याने लवकर न विकला गेलेला कांदा हा परदेशी कांदा सडलाय. यामुळे व्यापाऱ्यांना जवळपास 22 टन कांदा फेकून द्यावा लागलाय, अशी माहिती एपीएमसी मार्केटमधले होलसेल व्यापारी अशोक वाळूंज यांनी दिलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.