www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्यातल्या सर्व एटीएम सेन्टरमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश राज्य सरकारनं बँकांना दिले आहेत. ३१ डिंसेंबरपर्यंत एटीएमच्या आत आणि फेब्रुवारीपर्यंत एटीएमबाहेर सीसीटीव्ही बसवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळं आता सर्व बँकांच्या एटीएम सेंटरमध्ये सीसीटीव्ही बसवणं बंधनकारक आहे.
बंगळुरूमधल्या एका एटीएममध्ये महिलेवर प्राणघातक हल्ला झाला होता. त्यानंतर ‘एटीएम’मधील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आल्यानं राज्य सरकारनं हा निर्णय घेतल्याची माहिती गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिलीय. एटीएमचा वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी बँकांनी सुरक्षेचे पुरेसे उपाय केले नाहीत तर ती यंत्रे सुरक्षित नसल्याचे जाहीर करून बंद करून टाकावी लागतील, अशा शब्दांत गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी मंगळवारी बँकांना इशारा दिला आहे. महिनाभरात सुरक्षेचे उपाय करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
‘सीसीटीव्ही’शिवाय एटीएम केंद्रांवर २४ तास सुरक्षा व्यवस्था ठेवणं बंधनकारक आहे. तसंच दरवाजावर धोक्याची घंटा तसंच त्रयस्थ शटर बंद करू शकणार नाही अशा कुलुपांची व्यवस्थाही बँकांना एटीएम सेन्टर्सवर करावी लागणार आहे. दारावर जाहिराती लावू नये तसेच एटीएमच्या आत प्रखर उजेडाची व्यवस्था असावी, असंही स्पष्ट करण्यात आलंय.
राज्यात सुमारे आठ हजार एटीएम केंद्र आहेत. यापैकी २५०० एटीएम सेन्टर्स केवळ मुंबईत आहेत तर पुण्यात १६०० एटीएम सेन्टर्स आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.