घर विकत घेताना कुटुंबिय सदस्यांना स्टॅम्प ड्युटी माफ !

घर अथवा जमीन, शेतजमीन नावावर करताना स्टॅम्प ड्युटी (मुद्रांक शुल्क) आता द्यावी लागणार नाही, अशी घोषणा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत केली. मात्र, ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर हा व्यवहार होईल.

Updated: Mar 28, 2015, 02:42 PM IST
घर विकत घेताना कुटुंबिय सदस्यांना स्टॅम्प ड्युटी माफ ! title=

मुंबई : घर अथवा जमीन, शेतजमीन नावावर करताना स्टॅम्प ड्युटी (मुद्रांक शुल्क) आता द्यावी लागणार नाही, अशी घोषणा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत केली. मात्र, ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर हा व्यवहार होईल.

मुलांच्या किंवा रक्ताच्या नात्यामध्ये एखादी मालमत्ता नावावर करताना स्टॅम्प ड्युटी भरण्याची गरज राहणार नाही. मात्र त्यासाठी वारसा प्रमाणपत्र सादर करावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मालमत्ता हस्तांतरित करताना आतापर्यंत पाच टक्के मुद्रांक शुल्क भरावे लागत होते. मात्र आता ही प्रक्रिया सुकर झाली आहे.

विधानसभेत रात्री उशिरा पुरवणी मागण्यावर उत्तर देताना खडसे यांनी मुद्रांक शुल्क माफीची घोषणा केली. तसेच जात, उत्पन्न आणि अधिवास (डोमिसाइल) अशा विविध प्रमाणपत्रांसाठी देखील यापुढे स्टॅम्पपेपरची गरज नाही. साध्या कागदावर मसुदा लिहून ही प्रमाणपत्रे प्राप्त करता येतील. परंतु ही माहिती खोटी असेल तर अजामीनपात्र गुन्ह्याची नोंद होईल. तसेच दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा होऊ शकते, असेही खडसे यांनी स्पष्ट केले. 

जमीन खरेदी-विक्री आणि फेरफार नोंदी लवकरच ई पद्धतीने करण्यात येणार असून लिजवर दिलेल्या जमिनीवर बांधकामे झाली तर, रेडी रेकनरनुसार किंमत घेऊन त्या जमिनी सोसायट्यांना मालकी हक्काने देण्यात येणार आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.