मुंबई : काँग्रेस नेते नारायण राणे यांनी विधानपरिषदेत राज्याच्या कॅबिनेटमंत्र्यावर एका क्लास वन महिला अधिकाऱ्याशी अनैतिक वर्तन केल्याचा आरोप केला. राणेंच्या या आरोपावरून सत्ताधारी पक्षाचे मंत्री आणि आमदार चांगलेच आक्रमक झालेत.
मंत्रालयातील महिला अधिकारी एका मंत्र्याकडे गेली. तेथून बाहेर आल्यानंतर या अधिकारी महिलेने तडक दुसऱ्या मंत्र्याकडे जाऊन, ‘यापुढे आपण कधीही त्या मंत्र्याकडे जाणार नाही. त्याचा तुम्हीच बंदोबस्त करा’ अशी तक्रार केली, असे राणे यांनी सभागृहात सांगितले, तेव्हा सत्ताधारी बाकांवर चुळबूळ सुरू झाली होती. काही सदस्य राणे यांना आव्हान देण्याच्या तयारीत असतानाच राणे पुन्हा आक्रमकपणे झालेत. ‘याबाबतची सगळी माहिती आपल्याकडे असून त्या मंत्र्याचे नाव जाहीर करू का’ असा सवाल राणे यांनी करताच सत्ताधारी बाकांवर शांतता पसरली.
दरम्यान, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि शिवसेना आमदार नीलम गोऱ्हेंनी राणेंनी मंत्र्याचे नाव सांगितलं नाही, तर हक्कभंग आणण्याचा इशारा दिला. कोपर्डीत झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या मुद्द्यावर विधानपरिषदेत झालेल्या अल्पकालीन चर्चेदरम्यान राणेंनी हा आरोप केला.
मंत्र्यांच्या दालनात पोलीस तैनात करण्याची वेळ आल्याचेही राणेंनी यावेळी म्हटले. विधानपरिषदेत शिवसेना आमदार नीलम गोऱ्हेंनी राणेंच्या भाषणा दरम्यानच मंत्र्याचे नाव जाहीर करण्याची मागणी केली. नाव जाहीर झाले नाही, तर सर्वच मंत्र्यांकडे लोक संशयाच्या नजरेने बघतील असेही गोऱ्हे म्हणाल्या.