प्रदीप जैन हत्येप्रकरणी अबू सालेमला जन्मठेप

गँगस्टर अबू सालेमला मुंबईच्या विशेष टाडा कोर्टानं जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय. बिल्डर प्रदीप जैन हत्याप्रकरणी कोर्टानं ही शिक्षा सुनावली. 

Updated: Feb 25, 2015, 08:29 PM IST
प्रदीप जैन हत्येप्रकरणी अबू सालेमला जन्मठेप title=

मुंबई : प्रदीप जैन हत्या प्रकरणात मुंबई टाडा न्यायालायाने कुख्यात गँगस्टर अबू सलेम आणि त्याचा साथीदार मेहंदी हसन यांना मरेपर्यंत दुहेरी जन्मठेपेची आणि प्रत्येकी आठ लाख रुपये शिक्षा सुनावली आहे. 

दरम्यान, कोर्टानं अबू सालेमचा ड्रायव्हर मेहंदी हसन यालाही जन्मठेप आणि एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसंच बिल्डर विरेंद्र जांभ याला तीन वर्षाची शिक्षा आणि एक लाख रुपये दंड ठोठावला आहे.

अबू सलेम आणि मेहंदी हसन हे तालिबानी विचाराचे आहेत, त्यांचे आंतरराष्ट्रीय गँगशी संबंध आहेत, माणूसकी नावाचा प्रकार या दोघांत नाही आणि यांना कमी शिक्षा दिल्यास अशा गुन्हेगारांना अभय मिळेल, असा युक्तीवाद करत अबू सलेम आणि मेहंदी हसन यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी विशेष सरकारी वरील उज्वल निकम यांनी केली होती. पण पोर्तुगाल सरकारशी केलेल्या करारामुळे सालेमला फाशीची शिक्षा देत येत नाही म्हणुन फाशीची मागणी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी मागे घेतली होती. 
 
मार्च १९९५मध्ये बिल़्डर प्रदीप जैन यांची जुहूतील बंगल्याबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. पोलिसांच्या माहितीनुसार जैन यांनी सालेमसाठी जागा देण्यास नकार दिल्यानं त्यांची हत्या करण्यात आली होती. 

या प्रकणात खरी मेहनत घेतली ती मुंबई क्राईम ब्रांचने... १० वर्षानंतर त्यांनी प्रदीप जैन प्रकणाचा तपास हाती घेतला होता.
  
अबू सालेमवर भारतात एकूण २४ गुन्हे दाखल आहेत. आणि त्या सर्व प्रकरणाचे खटले सुरु आहेत. पण मुंबई टाडा न्यायालयाने गेली अनेक वर्षे सुरु असलेल्या प्रदीप जैन हत्या प्रकणात कडक शिक्षा सुनावून कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही हे दाखवून दिलंय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.