मुंबई : भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून वारंवार हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. त्यामुळे, बरीच सावधानताही बाळगली जातेय.
अशातच भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या आकाशात एअर इंडियाच्या एका वैमानिकाला निळ्या रंगाचे फुगे उडताना आढळले. त्यानं तातडीनं ही माहिती हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला दिली. त्याबद्दल तात्काळ मुंबई पोलिसांशीही संपर्क साधण्यात आला.
दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतही हायअलर्ट दिला गेलाय. तसंच पुढचा महिनाभर ड्रोन कॅमेरे आणि इतर हवेतील उपकरणांना मुंबई पोलिसांनी बंदी घातलीय.
एअर इंडियाच्या नागपूरहून मुंबईकडे येणाऱ्या विमानातील वैमानिकानं निळ्या रंगाचे फुगे आकाशात दिसल्याची माहिती दिल्यानंतर मुंबई पोलिसांनी अधिक चौकशी सुरु केलीय.
दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त दिसून येतोय. भारतात पंजाबच्या आंतरराष्ट्रीय सीमा भागातही भारतीय सेनेला काही धमकी देणारे फुगे आकाशात आढळल्याचं वृत्त आहे. पाकिस्तान एक मनोवैज्ञानिक अभियानाद्वारे धमकी देणारे आणि भ्रमित करणारे संदेश पाठवण्यासाठी फुगे आणि कबुतरांचा वापर करत असल्याचं सेनेच्या सूत्रांकडून समजतंय.