मुंबई महापौर निवडणुकीत भाजपची माघार

 मुंबई महापौर, उपमहापौर निवडणुकीतून भाजपने माघार घेतली आहे. भाजप कोणतीही निवडणूक लढविणार नाही.  

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 4, 2017, 07:25 PM IST
मुंबई महापौर निवडणुकीत भाजपची माघार title=

मुंबई : मुंबई महापौर, उपमहापौर निवडणुकीतून भाजपने माघार घेतली आहे. भाजप कोणतीही निवडणूक लढविणार नाही. त्यामुळे आता शिवसेनेचा महापौर होणार असल्याचे स्पष्ट झालेय. मुंबईत महापौर पदावरून सुरू असलेल्या रणसंग्रामातून भाजपने अखेर माघार घेतलीय. पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माघार घेतल्याचं जाहीर केले.

मुंबईच्या महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक भारतीय जनता पक्ष (भाजप) लढणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषेदेत केली. वर्षा बंगल्यावर झालेल्या पत्रकारपरिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही घोषणा केली. मुंबई महापौरपदाच्या शर्यतीत भाजपने माघार घेतानाच सर्व विषय समिती आणि विरोधी पक्षनेते पदाच्या निवडणुकीत माघार घेतली आहे. पारदर्शकतेच्या मुद्यासाठी आम्ही हा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री फडणीवस यांनी स्पष्ट केले.

कोणत्याही प्रकारची तडजोड करून आम्हाला महापौर पदाच्या शर्यतीत उतारायचं नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. त्याचबरोबर उपमहापौर आणि कोणत्याही समितीची निवडणूक लढणार नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. तसेच विरोधी पक्षात बसणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे शिवसेनेला अप्रत्यक्षरित्या मदत होणार आहे. 

भाजपच्या या निर्णयामुळे शिवसेनेचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा झालाय. महापालिका निवडणुकीत शिवसेनेला 84 जागा तर भाजपला 82 जागा मिळाल्यात. कोणालाही स्पष्ट बहूमत नसल्याने हा निर्णय घेतल्याच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. महापौर पदाची निवडणूक 8 मार्च रोजी होणार आहे. 

शिवसेनेकडून घोषणा

दरम्यान, महापौर पदासाठी शिवसेनेकडून नगरसेवक विश्वनाथ महाडेश्वर यांच्या नावाची घोषणा झालीय. महाडेश्वर हे शिवसेनेचे वॉर्ड क्रमांक 87 मधील विजयी नगरसेवक आहेत. तर उपमहापौरपदासाठी शिवसेनेकडून हेमांगी वरळीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. या दोन्ही उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत. दुसरीकडे आत्तापर्यंत थांबा आणि वाट बघा असे करणारी भाजप कोअर कमिटीने मुंबई महापौर पदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय.

 वर्षावर बैठक 

भाजपचा उमेदवार ठरवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षावर बैठक सुरु आहे. भाजपचा उमेदवार थोड्याच वेळात महापौरपदाचा अर्ज दाखल करणार आहे. काँग्रेसनंही महापौरपदासाठी नगरसेवक विठ्ठल लोकरे यांना उमेदवारी दिलीय. काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतलाय.

तर तिकडे सपाने महापौरपदाच्या निवडणुकीत उतरणार नसल्याचं स्पष्ट केलंय. पुरेसे संख्याबळ नसल्याने अर्ज भरणार नसल्याचे सपाचे नगरसेवक रईस शेख यांनी स्पष्ट केलंय. मात्र काँग्रेससोबत जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितलंय