मुंबई : भाजपने राज्यपालांच्या निर्देशांची पायमल्ली केल्याचा काँग्रेसचा आरोप भाजपने फेटाळून लावलाय.
मतविभागणीची कोणतीही मागणी विरोधकांनी केली नव्हती, असं विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान, विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व आमदारांचे आभार मानले.
भाजप सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होम टाऊन म्हणजेच नागपूरमध्ये भाजपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. नागपूरच्या महाल स्थित टिळक पुतळ्याजवळच्या भाजपच्या कार्यालयासमोर फटाके फोडून, ढोल वाजवत आणि मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला.
भाजपनं घटनेची पायमल्ली केल्याचा आरोप करत काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांनी आज विधानभवन परिसरात राज्यपालांची गाडी अडवली. राज्यपालांच्या अभिभाषणाला शिवसेना आणि काँग्रेसचा विरोध आहे. शिवसेनेकडून 'राज्यपाल परत जा' अशा घोषणा देण्यात आल्या.
राज्यपालांनी अभिभाषणाला जाऊ नये अशी विनंती काँग्रेसकडून राज्यपालांना करण्यात आली होती. सरकारकडून राज्यपालांच्या निर्देशांची पायमल्ली करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.