मुंबई : भाजप आमदार प्रशांत परिचारक यांच्या सैनिकांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्याचा मुद्दा सलग दुस-या दिवशी गाजतोय. परिचारकांच्या निलंबनाची मागणी करत विरोधकांनी जोरदार गोंधळ घातल्यामुळं विधान परिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
प्रशांत परिचारक यांच्य़ा निलबंनाशिवाय़ सभागृह चालू न देण्याच्या भूमिकेवर विरोधक ठाम आहेत. विधान परिषदेचे विरोध पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज पुन्हा परिचारकांच्या बडतर्फीची मागणी केली. सत्तेत असलेल्या शिवसेनेनंही या मुद्दावर आक्रमक भूमिका घेत परिचारकांच्या निलंबनाची मागणी केली आहे.
नीलम गो-हे यांनी शिवसेनेची अधिकृत भूमिका मांडत परिचारकांच्या निलंबनाची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. निलबंनाचा प्रस्ताव लगेचच मांडला जावा यासाठी विरोधक आमदारांनी गोंधळ घातला. त्यामुळं सभापतींनी दिवसभरासाठी कामकाज तहकूब केलं. परिचारकांच्या मुद्यावरून सरकार चांगलंच अडचणीत येण्याची शक्यता आहे.